वृत्तसंस्था / जकार्ता (इंडोनेशिया)
भारताचा नवोदित युवा बॅडमिंटनपटू किरण जॉर्जने रविवारी येथे झालेल्या 2023 च्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात जॉर्जने 82 व्या मानांकित जपानच्या कू ताकाहाशीचा पराभव केला.
किरण जॉर्जचे विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने गेल्यावर्षी ओडिशा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या देशाच्या प्रियांशु राजावतचा पराभव करत जेतेपद मिळविले होते. जकार्तामधील स्पर्धेत झालेल्या पुरूष एकेरीच्या सामन्यात किरण जॉर्जने जपानच्या कू ताकाहाशीचा 21-19, 22-20 अशा गेम्समध्ये केवळ 56 मिनिटात फडशा पाडत विजेतेपद मिळविले. 23 वर्षीय किरण जॉर्जने या अंतिम लढतीतील पहिल्या गेममध्ये जपानच्या ताकाहाशीवर 5 गुणांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी 20-20 अशी बरोबरी साधली. जॉर्जने यानंतर टायब्रेकरमध्ये सलग 2 गुण घेत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. किरण जॉर्जने हा दुसरा गेम 22-20 असा जिंकून ताकाहाशीचे आव्हान संपुष्टात आणले.
या स्पर्धेत भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांचा महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या लेनी मेसारी आणि रिबिका सुगीयार्तो यांनी 22-20, 16-21, 21-13 असा पराभव केला.