शाहुवाडी प्रतिनिधी
परळे पैकी मुटकलवाडी येथील गणपती ( पप्पू ) मारुती पाटील यांच्या मालकीचा १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा बैल विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून पाटील कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.
गणपती पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांचे मुटकलवाडी येथे घरानजीकच जनावरांचे शेड आहे. गुरुवारी सायंकाळी अचानक बैल हांबरू लागल्याने शेडमध्ये जाऊन बैलाला हात लावला असता त्यांना शॉक बसला घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी एक बैल सोडून बाहेर घेतला तर दुसऱ्या बैलाला सोडून बाहेर घेऊन येई पर्यंत शेडमधील दुसऱ्या बैलास जोराचा शॉक बसून तो जागेवरच मृत झाला. पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच हा बैल शर्यतीसाठी विकत आणला होता अतिशय देखणा आणि शर्यतीमध्ये चपळ असणाऱ्या बैलाच्या या अपघाती मृत्यूने पाटील कुटुंबीयांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. बैल बाहेर घेत असताना गणपती पाटील यांनाही विजेचा शॉक बसून किरकोळ जखम झाली आहे. दरम्यान घटनास्थळी महावितरणचे अधिकारी श्री. घाटे, तलाठी संध्या वाडकर, पशुवैद्यकीय अधिकारी गौरव तिकोटे, पोलीस पाटील किशोर पाटील, कुमार पाटील, यांनी भेट देऊन संबंधित घटनेचा पंचनामा केला.
संबंधित पाटील कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी त्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा उदरनिर्वाह या बैल जोडीवरच अवलंबून होता त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. दरम्यान याबाबत महावितरणचे अधिकारी श्री घाटे यांच्याशी संपर्क साधला असता सदर घटनेचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला असून याबाबतयोग्य ती तपासणी करून सदर घटना नेमकी कशामुळे घडली हे स्पष्ट होईल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.