कोल्हापूर प्रतिनिधी
निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांनी विरोधकांना योग्य उत्तर दिले असून त्यामुळे त्यांनी केलेल्या पोस्टरबाजीला काहीही अर्थ नाही. आजच्या सभेमध्येही सर्व विषयांना सभासदांनी एकमुखाने मंजूरी देऊन आम्हाला पाठबळ दिले असल्याचे मत महाडिक गटाचे नेते, राजाराम कारखान्याचे चेअरमन, आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले.
राजाराम सहकारी साखर कारखान्याची 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज काऱखान्याच्या कार्यस्थळावर संपन्न झाली. यावेळी काऱखान्यासमोर असणारे सर्व प्रस्ताव सभासदांनी एकमुखाने मंजूर केले. तर सभागृहाबाहेरच विरोधकांनी समांतर सभा घेऊन या सर्वसाधारण सभेतील प्रस्तावांचा निषेध केला.
सभेनंतर माध्य़मांशी बोलताना चेअरमन महाडिक म्हणाले, “विरोधकांकडून नेहमीच दिशाभुल केली जात आहे. निसर्गाच्या अनियमितते मुळे शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागत आहे. याचप्रमाणे संचालक मंडळाने मांडलेले सर्व प्रस्तावाला सभासदांनी एकमताने मंजूरी दिली आहे. सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही. काही मोजकीच 20- 25 लोक आहेत त्यांच्याकडून हा प्रकार केला जात आहे. पण कारखान्याच्या सर्व सभासदांनी आम्हाला एकदिलाने साथ दिली आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “कोल्हापूरचा कारखान्यामध्ये सांगलीचे सभासद का ? असा प्रश्न विचारून विरोधक गैरसमज पसरवत आहेत. विरोधक चुकिचा प्रचार करत असून कारखान्याच्या परिघातील गावांचा समावेश कारखान्याच्या विस्तारामध्ये केला जाणार आहे. कारखान्याचे क्रशिंग वाढवणे आणि गुऱ्हाळघरे बंद पडल्याने त्याला पर्य़ाय देणे यासाठी भांडवल गोळा करणे महत्वाचे असल्यानेच कारखान्याचा विस्तार महत्वाचा आहे.” असा खुलासा त्यांनी केला.
विरोधकांनी केलेल्या पोस्टरबाजीवर भाष्य करताना ते शेवटी म्हणाले, “निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या पोस्टरबाजीला काहीही अर्थ नसल्याचे दिसून येत आहे. आताही सभेमध्ये सर्व विषयांना सभासदांनी मंजूरी देऊन आम्हाला पाठबळ दिले आहे.” असेही ते म्हणाले.