उचगाव/वार्ताहर
बेंगळूर-पुणे महामार्गावर उचगांव गावच्या हद्दीत तनवानी काॅर्नर ब्रीजजवळ थांबलेल्या टेंपोतून तपासणीच्या बहाण्याने ड्रायव्हरच्या तोंडावर स्प्रे मारुन ६ लाख २६ हजार रेाख रक्कम जबरदस्तीने घेवून जबरी चोरी झाल्याची गांधीनगर पोलीस ठाणेत नुरमहंमद बाबालाल सारवान, (वय- ४८) व्यवसाय ड्रायव्हर रा. घर नं ३२६५, होस्पेट गल्ली, गोकाक, ता. गोकाक, जि.बेळगाव, कर्नाटक याने फिर्याद दिली. मात्र काही तासांतच तपासाची चक्रे वेगाने फिरवित ही जबरी चोरी झालीच नसून फिर्यादी नुरमंहमद सारवान यानेच हा बनाव केल्याचे निष्पन्न करीत त्याचे घरातून पोलीस पथकाने ६ लाख १८ हजार हस्तगत केले. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी नुरमहंमद बाबालाल सारवान यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत गांधीनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी नुरमहंमद बाबालाल सारवान वय- ४८ व्यवसाय ड्रायव्हर, रा. घर नं ३२६५, होस्पेट गल्ली, गोकाक, ता. गोकाक, जि.बेळगाव, कर्नाटक हे दि. १२ जुलै रोजी दुपारी बेंगलोर ते पुणे जाणारे हायवे रोडवर उचगांव गावचे हद्दीत तनवानी काॅर्नर ब्रीजजवळ त्यांचे ताब्यातील टेंपो उभा करुन थांबले असताना त्याचे टेंपोजवळ एक पांढरे रंगाची महाराष्ट्र शासन असे लिहीलेली टाटा सुमो गाडी आली . त्यातुन उतरलेल्या अज्ञात इसमाने टेंपोत चढून, गाडी चेक करणेचा बहाणा करुन फिर्यादीचे खिशातील रोख रक्कम ८ हजार व गोकाक येथील व्यापा-यांनी गांधीनगर येथील व्यापायाचे कपडे खरेदीचे दिलेले पैसे ६ लाख १८ हजार रुपयांची असलेली कॅरीबॅग असे एकूण ६ लाख २६ हजार रु. रेाख रक्कम त्यांच्या तोंडावर स्प्रे मारुन घेवून निघून गेले अशी, गांधीनगर पोलीस ठाणेत फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, गृह व उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग यांचे मार्गदर्शना नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस ठाणे सत्यराज घुले हे करत आहेत.
हे ही वाचा : खोट्या वजन काटा पावतीने ७ कोटींची फसवणूक; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सदर गुन्हा घडले ठिकाणी पोलीस उपअधीक्षक,गृह कोल्हापूर श्रीमती प्रिया पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी श्रीमती प्रिया पाटील यांनी गुन्हा तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सत्यराज घुले, स पो नि गांधीनगर पोलीस ठाणे व सहा फौजदार गायकवाड, पोहेकाँ विराज डांगे, मनोज खोत, बजरंग हेब्बाळकर,मोहन गवळी, दिगंबर सुतार, पोना आकाश पाटील, चेतन बोंगाळे,पोकाँ संतोष कांबळे,शहाजी पाटील यांनी साक्षीदार यांचेकडे तपास केला तसेच सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता, फिर्यादी सांगत असलेल्या हकिकतीमध्ये तफावत आढळून येत होती. त्यामुळे फिर्यादीकडे त्याला अधिक विश्वासात घेवून कौशल्याने तपास केला असता, यातील फिर्यादी नुरमहंमद सारवान याने सदर गुन्हा घडलेला नसून मी खोटी फिर्याद दिली आहे असे पोलिसांसमोर कबूल करुन माझ्याकडे गोकाक येथील व्यापा-यांनी गांधीनगर येथील व्यापा-यांना देणेसाठी दिलेली रक्कम रु ६,१८,००० असून ती माझ्या गोकाक, राज्य-कर्नाटक येथील घरात असलेचे सांगितले. त्यानुसार लागलीच गांधीनगर पोलीस ठाणेकडील पथक त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, पोहेकाँ विराज डांगे, पोना पाटील,पोना चेतन बोंगाळे यांना पंचासह फिर्यादी समवेत गोकाक,कर्नाटक येथे पाठविले. गोकाक येथे फिर्यादी नुरमंहमद सारवान याचे घरातून पोलीस पथकाने रु ६,१८,००० हस्तगत केले. गुन्ह्याचा तपास कौशल्याने करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गांधीनगर पोलीस ठाणे सत्यराज घुले हे करत आहेत.