नफ्याची रक्कम बुडीत कर्ज निधीमध्ये वर्ग केल्याच्या मुद्यावरून सभा गाजली; लाभांश समकरण निधी तरतुदीवरून सत्ताधारी-विरोधक आमने सामने; प्रत्येक प्रश्नांवरून सभेत गोंधळ ; 2021-22 सालातील जुना ताळेबंद नामंजूर, नवीन मंजूर
कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाने माजी संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढून त्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी अहवाल सालात 2 कोटी 38 लाख इतका नफा फुगवून दाखविल्यामुळे बँकेवर 46 लाख 50 हजारांच्या इन्कम टॅक्सचा भुर्दड बसल्याचा सत्ताधाऱ्यांनी आरोप केला. यावेळी माजी संचालकांच्या 13 वर्षांच्या सत्ता कालावधीतील कारभाराची चौकशी करण्याचा ठराव सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे विरोधकांनी अहवाल सालात दाखवलेला नफाच बोगस असल्याचे खुद्द बँकेच्या कार्यकारी संचालकांनी सांगितल्यामुळे विरोधी संचालकांना बोलण्यासारखे काहीच उरले नाही.
अधिक वाचा- शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळ अन् धक्काबुक्की
दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दुपारी 1 वाजता सुरु झाली. अध्यक्ष अर्जून पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत प्रत्येक प्रश्न आणि उपप्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्यामुळे तब्बल चार तास सभा चालली. सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभेचा इतिहास पाहता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याच्या अनेक घटना आहेत. पण शिक्षक बँकेच्या सभेत नूतन संचालकांनी विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले. सभेमध्ये सत्ताधारी संचालकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्यास उपस्थित सभासदांनी दाद दिल्यामुळे माजी संचालक आपली बाजू ठोसपणे मांडण्यामध्ये अपयशी ठरले.
बँकेच्या उपाध्यक्ष पद्मजा मेढे यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर अध्यक्ष अर्जून पाटील यांनी प्रस्ताविकास सुरुवात केली. याचवेळी सभागृहातील वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे साऊंड सिस्टिम देखील बंद झाली. त्यामुळे पाटील यांनी काही वेळ आपले प्रास्ताविक थांबवले. त्यानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर त्यांनी एक शायरीचे सादरीकरण करून विरोधकांना सूचक इशारा दिला. तेंव्हापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक खडाजंगी होऊन गोंधळ सुरु झाला. यावेळी माजी संचालक प्रसाद पाटील यांनी नफा विभागणी पुर्णतः बेकायदेशीर असल्याचे मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण माईकअभावी त्यांचा आवाज व्यासपीठापर्यंत पोहोचू शकला नाही. यावेळी प्रास्ताविक सुरु असताना मध्येच बोलू नये असा पवित्रा घेत सत्ताधारी गटातील काही शिक्षकांनी पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न करताना त्यांना धक्काबुक्की झाली.
अध्यक्ष अर्जून पाटील यांनी प्रास्ताविकांतून विरोधकांवर शाब्दीक बाण सोडण्याची एकही संधी गमावली नाही. अहवाल सालातील व्यवसायाची माहिती सांगताना नवीन संचालक मंडळाच्या गेल्या दोन महिन्यांच्या काळात 51 नवीन सभासद केल्याचे स्पष्ट करून ठेवींमध्ये 33 कोटींची वाढ झाल्याचे सांगितले. तसेच विरोधकांनी नफा तोटय़ाला न दाखवता या रकम येणे दाखवून नफा फुगवून दाखवला आहे. पण प्रत्यक्षात बँक तोटय़ात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच सभासदांना लाभांश देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. पण नूतन संचालक मंडळाच्या काळात सभासदांना 30 सप्टेबर 2022 ते 1 एप्रिल 2023 या सह महिन्यांच्या कालावधीतील ठेवीवरील व्याज 6 टक्केप्रमाणे देणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. तसेच 5 लाखांपर्यंतच्या आकस्मित कर्जाचा व्याज दर 10 टक्केवरून 9.50 टक्के करणार असल्याचेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. कर्जदार डीसीपीएस शिक्षक बांधवांपैकी कोणाचा आकस्मित मृत्यू झाला तर त्यांना कर्जमाफी देता येईल काय, याबाबत विचारविनिमय करण्यासाठी समिती गठीत केली असून दोन महिन्यांत त्यांच्यासाठी आकर्षक योजना जाहीर करू अशी ग्वाही अध्यक्ष पाटील यांनी दिली. 5 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण तसेच सभासदांना 12 लाखापर्यंतचे 9.50 टक्के व्याजदराने कारलोन देणार असून सत्ताधारी असो अगर विरोधक, कर्ज मंजूरीसाठी कोणाचीही अडवणूक करणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. अद्ययावत कोअर बँकींग प्रणाली, मोबाईल बँकींग, सर्व शिक्षकांचे पगार शिक्षक बँकेतच, शाखा विस्तार असे अनेक निर्णय भविष्यात घेतले जातील असेही अध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले.
जुना ताळेबंद नामंजूर, नवीन ताळेबंद मंजूर
बँकेचे कार्यकारी संचालक संजय मगदूम यांनी सभेपुढीलव विषय वाचन केले. यामध्ये सन 2021-22 या अर्थिक वर्षातील 31 मार्च 2022 अखेरपर्यंतचा जुन्या संचालक मंडळाच्या काळातील ताळेबंद सभेत नामंजूर करण्यात आला. तर विद्यमान संचालकांनी विविध तरतूदींमध्ये केलेल्या नफा विभागणीचा ताळेबंद बहुमतांनी मंजूर करण्यात आला. याला माजी संचालकांनी केलेला विरोध सत्ताधाऱ्यांनी गृहित धरला नाही.
17 पुढारी अन् 18 कारभारी नाही.
विरोधी संचालक मंडळाच्या 13 वर्षांच्या कालावधीत 17 पुढारी आणि 18 कारभारी होते. पण नवीन संचालक मंडळामध्ये सलग 17 संचालक एकविचाराचे असून बँकेचा कारभार देखील सर्वांना विश्वासात घेऊन केला जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष पाटील यांनी दिली.
अहवाल सालातील नफा बोगस.
सभेच्या सुरुवातीपासूनच अहवाल सालातील नफा बोगस असल्याचे आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. यावेळी सत्ताधारी गटाच्या कोअर समितीचे सदस्य संदीप मगदूम यांनी हाच प्रश्न कार्यकारी संचालक संजय मगदूम यांना उपस्थित केल्यानंतर त्यांनी नफा बोगस असल्याचे जाहीरपणे सांगितले.
पोलीस बंदोबस्ताशिवाय सभा
शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेचा अनेक वर्षांपासूनचा इतिहास पाहता बहुतांशी सभा पोलीस बंदोबस्तांमध्ये पार पडल्या आहेत. त्यामुळे आम्ही जेलमध्ये येतो की सभेमध्ये हेच काही कळत नव्हते. पण आम्ही सर्व शिक्षक सभ्य असून पोलीस बंदोबस्ताची गरज नाही. त्यामुळे ही सभा पोलीस बंदोबस्ताशिवाय होत असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
सांगा पाहू … राजषी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष कोणते ?
दि प्राथमिक शिक्षक बँक ही सन 1939 साली स्व. रावसाहेब भोसले यांनी स्थापन केली. रविवारी बँकेची 84 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये सभासदांना दिलेल्या अहवालाच्या मुखपृष्टावर राजषी शाहू महाराजांची प्रतिमा आणि त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षाचा उल्लेख केला आहे. यामध्ये शताब्दी वर्षाचा उल्लेख करताना 1902-2022 असा उल्लेख केला आहे. तर राजर्षीऐवजी राजर्षि अशी छापले आहे. याबाबत माजी संचालकांनी अध्यक्ष पाटील यांना प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी हा प्रश्न अत्यंत मिश्किलपणे घेऊन झाली असेल चूक समजावून घ्या असे अगदी सहजपणे उत्तर दिले. त्यामुळे राजर्षींबद्दल गुरुजींनाच विसर पडल्याचे स्पष्ट झाले.