डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर
कोल्हापूर प्रतिनिधी
महावीर महाविद्यालयाचे मराठी विभागातील डॉ. शरद गायकवाड यांना मॉरीशस देशाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मॉरीशसमधील मराठी भाषा मंडळाचे अध्यक्ष असंत गोविंद यांनी पुरस्कार निवडीचे पत्र पाठवले आहे. त्यांचा मॉरीशसमध्ये सन्मान होणार असल्याने शिक्षण क्षेत्रातून त्यांचा सन्मान होत आहे.
डॉ. शरद गायकवाड यांनी यापुर्वी 2018 मध्ये रशिया देशातील मॉस्को शहरातील आलेक्झांडर पुश्कीन विद्यापीठामध्ये ‘जागतीक मानवतावादी लेखकः अण्णाभाऊ साठे’ या विषयावर मार्गदर्शन केले. 2019 मध्ये थायलंड येथील बँकॉकमधील थोनबुरी विद्यापीठातील ‘फुले-शाहू-आंबेडकर साहित्य संमेलनात’ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 2022 हिमाचल प्रदेशातील सिमला विद्यापीठातील ‘फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ आणि भारतीय लोकशाही’ विषयावर व्याख्यान दिले. तसेच मलेशियातील आय. एन. टी. आय. आंतरराष्ट्रीय विद्यापीठात ‘फुले-शाहू-आंबेकर-अण्णाभाऊ साठे या महापुरूषांच्या विचार कार्यतत्वज्ञानाचा जागतिक पातळीवर झालेला परिणाम’ या विषयवर मार्गदर्शन केले. कोल्हापूर व नाशिक साहित्य़ संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. समाजप्रबोधन चळवळीवर आधारीत 11 ग्रंथाचे लेखन केले. पोतराज प्रथा जटा निर्मूलन, अंधश्रध्दा निर्मूलन, जाती तोडा-समाज जोडा, व्यसन मुक्ती अभियान, संविधान साक्षरता, आदी विषयावर समाजप्रबोधन कले. यापुर्वीही त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. डॉ. गायकवाड यांनी साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक आदी कार्याची दखल घेवून मॉरीशस देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.