कसबा बावड्यातील एकावर गुन्हा
कोल्हापूर प्रतिनिधी
पोलीस दलामध्ये तसेच रेल्वेत भरती करण्याच्या आमिषाने तरुणांची पावणे आठ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कसबा बावडा येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. विजय लक्ष्मण व्हरांबळे असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अविनाश माने यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित विजय व्हरांबळे याची कसबा बावडा येथे ऍकॅडमी आहे. यामधून पोलीस भरतीसह विविध ठिकाणी नोकरी लावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सोमवार पेठ येथील अविनाश माने यांनी विजय व्हरांबळे याची भेट घेतली. यानंतर ते संशयित व्हरांबळेच्या कसबा बावडा येथील ऍकेडमीमध्ये पोलीस भरतीचा सराव करत होते. व्हरांबळेने माने यांना रत्नागिरी येथे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मदत करतो, भरती करतो किंवा रेल्वेमध्ये शिपाई पदावर भरती करतो असे सांगून 3 लाख 35 हजार रुपये घेतले. तसेच इतर साक्षीदारांना पोलीस अगर रेल्वे भरती करण्याचे आश्वासन दिले. व्हरांबळेने माने यांच्यासह अन्य काही तरुणांकडून एकूण 7 लाख 75 हजार रुपये उकळले आहेत. हा प्रकार जानेवारी 2019 ते डिसेंबर 2021 या कालावधित घडल्याची फिर्याद माने यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक श्वेता पाटील करीत आहेत.