संतोष पाटील,कोल्हापूर
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा 30 जूनला शपथविधी झाल्यानंतर 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर दीड महिन्यांनी पालकमंत्री जाहीर झाले. मागील पाच महिन्यापासून इच्छुकांच्या नजरा मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागल्या आहेत. कोल्हापूर जिह्यातून शिंदे-फडणवीस समर्थक अशा सर्वच आमदारांना मंत्रीपदाची आस लागली आहे. मात्र, शपथविधीचा मुहूर्त अजून गुलदस्त्यात असल्याने सर्वचजण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.
20 जून 2022 रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. सर्वप्रथम 21 जूनला एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाले. आठवड्याच्या घडामोडींनंतर गुहाहाटी, गोवा असा प्रवास करत शिंदे थेट मुंबईच्या राजभवनावर दाखल झाले. याठिकाणी 30 जून रोजी शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आणि अखेरीस या नाट्याच्या पहिल्या अंकावर पडदा पडला. 4 जुलै रोजी 164 विरुध्द 99 मतांनी शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. सुमारे 45 दिवसांच्या अंतराने महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा 9 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिंदे यांच्याकडे दहा तर फडणवीस यांच्याकडे सहा खात्यांचा पदभार आला.
भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीष महाजन, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे तर शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा.तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई या दोन्हीकडील प्रत्येकी नऊ अशा अठरा आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मोठ्या प्रतिक्षेनंतर 24 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. उपम्ख्युमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिह्याची जबाबदारी घेतली. मागील पाच महिन्यापासून इच्छुकांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यतेने इच्छुकांनी पुन्हा जोर लावला आहे. यानिमित्ताने जिह्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस समर्थकांचे मंत्रीपदाचे दावेदार आणि त्यांच्या दाव्यांचा घेतलेला आढावा.
यांच्या शब्दाला महत्व असेल..!
जिह्यात मंत्रीपद देताना मंत्री चंद्रकांत पाटील, खा. संजय मंडलिक आणि खा. धनंजय महाडिक यांचा शब्द महत्वाचा ठरणार आहे. जिह्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशी संधी मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय महत्व पाहता यामध्ये अजून मंत्रीपद वाढू शकते. तसेच किमान आणखी दोघांची महत्वाच्या महामंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
आ. विनय कोरे : जनसुराज्य पक्ष म्हणून जिल्हा राजकीय ताकद सिध्द केली आहे. मागील काही वर्षापासून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात यांची विशेष ओळख आहे. राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदासह जिह्याचे पालकमंत्री म्हणून विनय कोरे यांना पदभार मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.
आ. प्रकाश आवाडे : इचलकरंजीतून अपक्ष विधानसभा जिंकल्यानंतर बदलत्या राजकीय स्थितीतही काँग्रेस सोडून भाजपला साथ दिली. याचे रिटर्न गिफ्ट म्हणून तसेच प्रकाश आवाडे यांच्या राजकीय वारसा आणि कारकिर्दमुळे भाजपच्या कोट्यातून मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
आ. राजेंद्र पाटील यड्रावकर : अपक्ष निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीत शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झाले. सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला उभे राहिले. अडीच वर्षात मंत्री म्हणून काम केल्याने यड्रावकर यांचाही या पदावर ठाम दावा असल्याचे सांगितले जाते.
आ. प्रकाश आबिटकर : प्रकाश आबिटकर यांनी पहिल्या टप्प्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या निर्णय घेतला. महाविकास आघाडीत शिवसेनेनं मंत्रीपदापासून दूर ठेवल्याची सल आबिटकर समर्थकांत आहे. शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून मंत्रीपदाची संधी मिळावी अशी आशा समर्थकांना आहे.
राजेश क्षीरसागर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून राजेश क्षीरसागर परिचित आहेत. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत क्षीरसागर यांचा समावेश होवून त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.