आष्टा / वार्ताहर
फटाक्यांमुळे एखाद्या सणाचा आनंद द्विगुणित होत असतो. मात्र फटाके फोडताना काळजी घेतली नाही तर गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशीच वेदनादायक घटना पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत घडली.
गुरुवारी सायंकाळी कोडोली येथे विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या विसर्जन मिरवणुका धुमधडाक्यात काढल्या. फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी आणि डॉल्बीच्या दणदणाटामुळे मिरवणूक पाहण्यासाठी चौका चौकात मोठी गर्दी झाली होती. भगत संभाजी चव्हाण मुळ गांव देवाळे सध्या राहणार कोडोली हा तरुण मिरवणूकीत सहभागी झाला होता. कोडोली गावातील मेन रोडवर मिरवणूक आली. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. यावेळी भगत चव्हाण हा फटाका विझला आहे असे समजून फटाक्याजवळ गेला असता अचानक फटाका फुटला. यावेळी फटाक्याच्या दणक्याने भगत याचा एक डोळा निकामी झाला.
ही घटना पाहून घटनास्थळी जमा झालेल्या महिला ग्रामस्थ तसेच तरुणांचा थरकाप उडला. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. जखमी तरुणास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र फटाक्याच्या स्फोटामुळे तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून त्याची तब्येतही चिंताजनक बनली आहे.