ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरीतील एका सायकल दुकानाला आग लागली आहे. दुकानाचे गोडावून असलेल्या ठिकाणाला ही आग लागली आहे. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. यांनतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार बंब दाखल झाले असून आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक तासभरापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.
सायकल दुकानाच्या गोडावूनला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान ऑक्सिजन सिलेंडर लावून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीत गोडावूनमधील सायकल आणि टायर पेटून नुकसान झाल्याची माहिती आहे. सायकल दुकानाचे गोडावून लक्ष्मीपुरी भाजी मंडई परिसरात असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच याठिकाणी असणाऱ्या नागरिकांना हटविण्याचे काम सुरू आहे.