पुलाची शिरोली/प्रतिनिधी
पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथील युनिक ऑटोमोबाईलमध्ये महिला विक्री सल्लागाराकडून वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सुमारे पाच लाख पासष्ट हजार (५,६५०००) रुपयांना फसवले. युनिक ऑटोमोबाईल्सचे विक्री व्यवस्थापक रुपेशकुमार श्रीमंत धनवडे (वय ३३, रा. चंदूर, ता. हातकणंगले) यांनी याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धनवडे यांच्या तक्रारीवरून प्रिया सागर खोत (रा. शिवछाया पार्क, बोंद्रे नगर रोड, कोल्हापूर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ४६५, ४६७, ४७१, ४०६, ४७७, ४०८ व ४६८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्राहकाकडून रोख स्वरूपात रक्कम घेऊन संबंधित रक्कम कंपनीच्या कॅशियर कडे जमा न करता परस्पर पावत्या देऊन ही फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, युनिक ऑटोमोबाईलच्या एक्सचेंज ऑफर मध्ये २४ ऑक्टोबर २०२१ रोजी एक ग्राहक आपली वॅगनार मोटार देऊन त्याच्या बदली औरा सीएनजी ही मोटार खरेदी करणार होता. पण त्यांच्या वॅगनारची एक्सचेंज मधील किंमत अतिशय कमी झाल्याने यांनी एक्सचेंज करण्याचे रद्द केले. मात्र औरा सीएनजी ही मोटार रुपये पाच हजार रोख देऊन बुकिंग केली. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात २६ ऑक्टोबर २०२१ रोजी संबंधित ग्राहकांनी रुपये तीन लाख साठ हजार रुपये रोख रक्कम प्रिया खोत यांच्याकडे देऊन त्याची पावती घेतली. त्यानंतर सुमारे एक महिन्यानी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी संबंधित ग्राहकाने पुन्हा प्रिया खोत यांच्याकडे दोन लाख रुपये रोख दिले व पावती घेऊन निघून गेले. तिन्ही वेळी प्रिया खोत यांनी संबंधित ग्राहकाला बनावट पावत्या दिल्या व मिळालेली रक्कम कॅशियरकडे जमा केली नाही. विक्री व्यवस्थापक धनवडे यांनी प्रिया खोत यांना ही रक्कम कंपनीकडे जमा करण्यासाठी काही महिन्यांची मुदत दिली होती. मुदतीत ही रक्कम जमा न केल्याने विक्री व्यवस्थापक धनवडे यांनी प्रिया खोत यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर बी. कुंभार हे तपास करत आहेत.