प्रतिनिधी/गडहिंग्लज
लडाख येथे लष्कर वाहनाच्या अपघात दुर्देवी विरमरण आलेल्या बसर्गेच्या प्रशांत जाधव याच्या निधनाने गावासह सीमाभागातील गावात निशब्द शांतता पसरली आहे. शुक्रवारी दुपारी अचानक अपघातात मयत झाल्याची बातमी वादळासारखी पसरल्यानंतर जाधव कुटूंबियाबरोबर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर दुःखाचा डेंगर कोसळले आहे. प्रशांतचे पार्थिव उद्या रविवारी बेळगाव मार्गे बसर्गे गावी येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
अगदी उमद्या वयात देश सेवा बजावत असताना बलीदान दिलेल्या प्रशांतचे शालेय शिक्षण येथील एस. एन. हायस्कूल येथे झाले. ज्या शाळेत खेळला बागडला आणि देश सेवेसाठी गेला त्याच शाळेच्या मैदानावर शासकीय अंत्यसंस्कार होणार आहे. यासाठी मैदानावर स्मृती चौथरा उभारणीचे काम सुरू झाले असून रविवारी सकाळी दिल्लीहून विमानाने बेळगावला येणार आहे. त्यानंतर लष्करी वाहनातून पार्थिक मुळगावी बसर्गे येथे आणले जाणार आहे. प्रशांत च्या पार्थिवावर शासकीय अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली असून ग्रामस्थ देखील दुख सावरत तयारीला लागले आहेत. ठिकठिकाणी पार्थिवाचे स्वागत करण्यासाठी तरूण मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायती कर्मचारी धडपडताना दिसत आहेत. गावच पोरग देशसेवेसाठी बलिदान झाला हा अभिमान व्यक्त करत ज्येष्ठ मंडळी पार्थिवाकडे डोळे लावून बसले आहेत. अंत्यविधीला होणारी संभाव्य गर्दी पहाता प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे.