मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करताना फेरबदल केले आहे. गेली 25 वर्षे कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हसन मुश्रीफ यांना याच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडली आहे. शिंदे- फडणवीस यांच्या सरकारच्या शपथविधीनंतर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिपक केसरकर यांच्याकडे सोपवली होती. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आजच्या नव्या यादीमध्ये दिपक केसरकर यांच्याकडून काढून घेण्यात येऊन ते आता वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे.
पालकमंत्रीपदाचे वाटप करताना मुख्यमंत्र्यांनी अनेक मोठे बदल केले आहेत. विशेषता पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे होते ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तर चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूरची जबाबदारी सोपवली आहे.
2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद देण्यात आले होते. त्यापुर्वीही त्यांनी कामगार आणि पाठबंधारे विभागाची मंत्रीपदे भुषवली आहेत. 2019 च्या महाविकास आघाडीच्या काळात कोल्हापूरचे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. पण त्यावेळी पालकमंत्रीपदाने हुलकावणी दिली. कारण ज्यांचे आमदार जास्त त्यांच्याकडे पालकमंत्रीपद या न्यायाने ते काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्याकडे गेले.
पण 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार आले. त्यानंतर अजितदादा यांनी शिंदे- फडणवीस सरकारला दिलेल्या पाठींब्यामुळे हसन मुश्रीफ यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले. पालकमंत्रीपदासाठीच्या मुद्यावर रस्सीखेच सुरु असताना कोल्हापूरच्या मंत्रीपदासाठी चंद्रकांतदादा पुन्हा आग्रही होते. तसेच पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांना हवे असल्यास कोल्हापूर चंद्रकांतदादासाठी सोडावे लागेल अशी अटही भाजपने ठेवल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये हसन मुश्रीफांनी बाजी मारून कोल्हापूरचे पालकमंत्रीपद आपल्या पदरी पाडून घेतले आहे.