ऐतिहासिक दसरा चौकात राज्य सरकारला विचार जाब : वसंतराव मुळीक यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी बेछुट लाठीहल्ला केल्याने असंख्य आंदोलक जखमी झाले. अत्यंत अमानवी, अमानुषपणे पोलिसांनी केलेल्या या लाठीहल्ल्याचा सकल मराठा समाजाने तीव्र शब्दात निषेध केला असून राज्य सरकारला या संदर्भात जाब विचारण्यासाठी सोमवारी (दि. 4) सकाळी 11: 30 वाजत येथील ऐतिहासिक दसरा चौकात जबाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला कोल्हापूरातील स्वाभिमानी जनतेने, समाज बांधवांनी, कार्यकर्ते, सर्व पक्ष, संघटनानी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी केले आहे.
मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याविषयी तीव्र शब्दात संताप व्यक्त करताना मुळीक यांनी सांगितले की, जालना येथे शांततेने चाललेल्या उपोषण आंदोलना प्रसंगी पोलिसांनी अचानक पणे बेछूट व अमानवी असा लाठीहल्ला करून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. भरीत भर हवेत गोळीबार करून चुकीची पावले उचलली. लहान मुलासह महिलांना बदडून काढले. त्यामध्ये असंख्य स्त्राr, पुरूष, युवक, युवती रक्तबंबाळ झाले. ही गोष्ट अमानवी व चीड आणणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या भावना व्यक्त करण्यासाठी व आंदोलकांना मारहाण केलेच्या निषेधार्थ राज्य शासनाला जाब विचारण्यासाठी जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोल्हापुरातील स्वाभिमानी जनतेने, समाज बांधवांनी, कार्यकर्ते, सर्व पक्ष, संघटनानी उपस्थित रहावे, असे आवाहनही मुळीक यांनी केले आहे.