सत्तार हजार ते सव्वा लाखांपर्यंत एका कार्यक्रमाची सुपारी
अहिल्या परकाळे कोल्हापूर
गणेशोत्सवात मोठी गणेश मंडळ ढोल-ताशांबरोबर कलापथकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. राज्यभरातून गणपती विसर्जनापर्यंत कलापथकांचे बुकींग फुल्ल झाले आहे. वाढत्या महागाईनुसार कलापथकांच्या मानधनातही वाढ झाली असून, सत्तर हजारांपासून ते सव्वा लाखांपर्यंत सुपारी मिळत आहे. त्यामुळे यंदा कलापथकांची चांदी असल्याने कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गणेशोत्सव म्हंटल की मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असते. म्हणूनच गणेशोत्सवात गणेश मंडळ वक्तृत्व, लिंबू चमच्या, पाककृती, रांगोळी, मेहंदी रचना स्पर्धांचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमासह महाप्रसाद आणि कलापथकांच्या कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. यंदा अनेक कलापथकांना तब्बल दहा दिवसांच्या कार्यक्रमांचे बुकींग मिळाले आहे. कलापाथकांना प्रत्येक दिवसाला एक लाखाची सुपारी मिळत असल्याने दहा दिवसात किमान दहा लाखाचे उत्पन्न मिळणार हे निश्चित. 35 कलाकारांचे एक कलापथक असते, यापैकी एक जरी नसला तरी कलाविष्कार सादरीकरणाला अडथळा येवू शकतो. परिणामी कलापथक संस्थापक, मालक आपल्या कलाकारांना टिकवून ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. महागाईनुसार कलाकारांच्या मानधनात वारंवार वाढ करावी लागते. त्यामुळे कलापथकांच्या सुपारीचा दरही वाढला आहे.
कोल्हापूर शहरात अनेक कलापथक, नाट्यासंस्था, नृत्य संस्था आहेत. या संस्थांना शहरातील एका तरी गणेश मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बोलावलेले असतेच. या संधीचा फायदा घेत गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक कलापथकांनी आपल्या नाट्याविष्कारातून सामाजिक संदेश देण्याचा निश्चय केला आहे. मनोरंजनाला सामाजिक किणार देवून भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी डॉल्बीला फाटा देत अनेक मंडळांनी कलाकारांच्या सादरीकरणाला महत्व दिले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यातून कलापाथकांना नाट्या सादरीकरणासाठी हजारो रूपयांची सुपारी मिळाली आहे. यातून कलाकारांच्या संसाराचा गाडा रूळावर येण्यासाठी मदत होईल. ऐवढेच नव्हे तर देशावरील महागाईचे संकट दूर करण्याची विनवनी विघ्नहर्त्याला कलाकार करीत आहेत.
कलाकारांच्या मानधनात वाढ
महागाईनुसार कलाकारांच्या मानधनात वाढ झाल्याने कार्यक्रमाच्या सुपारीची रक्कम वाढवणे अपरिहार्य आहे. कलाविष्कारासाठी लागणारे साहित्य आणि प्रवास खर्च त्याचबरोबर कलाकारांचे मानधन या सुपारीतूनच द्यावे लागते. त्याचबरोबर कलाकार कलापथक संस्थेच्या रूपाने कुटुंबाचाच एक भाग झालेले असतात. त्यामुळे कलाकारांच्या आरोग्याची काळजीही घेणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. यंदाच्या गणेशोत्सवात कार्यक्रमांचे बुकींग झाले असून कलाकारांना चांगले दिवस यावेत, अशीच प्रार्थना गणपतीला करीत आहे.
मुकुंद सुतार (झंकार बिटसचे मालक तथा कलापथक निर्माता असोसिएशनचे अध्यक्ष)
निसर्गाची साथ हवी
गणेशोत्सवात कलापथकांच्या कार्यक्रमाची रेलचेल असणार यात शंका नाही. परंतू सादरीकरणाच्या दिवशीच पाऊस आला तर कलापाथकांचे कार्यक्रम रद्द करावे लागणार. त्यामुळे कलापथकांना निसर्गाची साथ मिळाली पाहिजे. कारण गणेशोत्सवातील जल्लोष पुन्हा नसतो. त्यामुढे पुढच्या वर्षापर्यंत गणेश मंडळांच्या सुपारीची वाट पाहावी लागणार, अशा भावना कलाकारांकडून व्यक्त होत आहेत.
ढोल-ताशाला पसंदी
गणेशोत्सवात डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्याला महत्व दिले आहे. त्यामुळे गणपती आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अनेक मंडळांनी ढोल-ताशाला पसंदी दिले आहे. त्यामुळे वर्षभर सराव करणाऱ्या ढोल-ताशा पथकाला चांगले दिवस आले आहेत. अलीकडे ढोल-ताशा पथकाची कमाई चांगली होत असल्याच्या भावना कलाकारांकडून व्यक्त होत आहेत.