कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती नजीकच्या काळात कोणत्या मार्गाने, वाटचाल करणार, त्याची भूमिका काय असणार? याबद्दल राजकीय वर्तुळात कुतुहल, उत्सुकता निर्माण झाली आहे. स्वतः संभाजीराजे यांनी आपण राजकारणात सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण आता ते नेमक्या कोणत्या राजकीय विचारधारेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणार याकडे राज्याच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरूवारी (12 मे) संभाजीराजे पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. दरम्यान, चलो पुणे… आता महाराष्ट्राच्या भल्यासाठी….नवी दिशा..नवा विचार…नवा पर्याय अशी टॅग लाईन घेऊन संभाजीराजे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे.
3 मे रोजी संभाजीराजे यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल पूर्ण झाला. राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांना भाजपने सहावर्षांपूर्वी संधी दिली होती. पण खासदार झाल्यानंतर संभाजीराजे यांनी कधीही भाजपच्या कार्यक्रमात, प्रचारात सहभाग घेतला नव्हता. दरम्यानच्या काळात रायगड जतन, संवर्धनात संभाजीराजे यांनी आग्रही भूमिका घेत प्रलंबित कामे पूर्णत्वाकडे नेली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासह इतर प्रश्न व मागण्यांबाबतही त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रसंगी राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही अंगावर घेतले. गेल्या सहा वर्षात खासदारकी भूषवित असताना संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या चळवळीच्या माध्यमातून राज्यभर आपल्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क तयार केले आहे. दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हय़ांसह विदर्भ, मराठवाडय़ातील जिल्हय़ात संभाजीराजे यांनी आपला प्रभाव निर्माण केला आहे. त्यांच्या राज्यभरातील संवाद यात्राही प्रभावी ठरल्या होत्या. त्यातून त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर जनमानसातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल संपल्यानंतर संभाजीराजे पुढे कोणत्या दिशेने जाणार?, राजकारणात ऍक्टीव्ह होणार काय?, कोणत्या विचारधारेला जवळ करणार? या बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. 6 मे शाहू स्मृती शताब्दीनंतर आपण भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगत संभाजीराजे यांनी आपण राजकारणात सक्रिय होणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यामुळे यापुढे ते राजकारण करणार हे स्पष्ट असले तरी ते राज्यात रमणार की देशपातळीवर रमणार? याबद्दलही सस्पेन्स कायम आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे पुण्याच्या 12 मेच्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे जाहीर करणार आहेत. त्या दृष्टीने त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.
फडणवीसांची भेट, शरद पवार यांचे विधान
संभाजीराजे मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले. त्याचवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापुरात होते. संभाजीराजे फडणवीस यांच्यातील भेट होण्याआधीच पवार यांनी पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांना राज्यसभेत पुन्हा पाठविण्याविषयी सकारात्मक भूमिका मांडताना काँग्रेस, शिवसेनेबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे संभाजीराजे काँग्रेस विचारधारेबरोबर जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मी राजकारणात सक्रिय होणार आहे, महाराष्ट्राबरोबर दिल्लीही मला आवडते, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनंतर मी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार 12 मे रोजी पुण्यात भूमिका मांडेन. तेथेच प्रश्नांची उत्तर मिळतील.
-युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार