भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि गोकुळ संचालिका शौमिका महाडिक या भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागली असतानाच राज्यसभा खासदार आणि महाडिक गटाचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाने आदेश दिला तर महाडिक परिवार लोकसभाही लढण्यास तयार असल्याचे सुतोवाच केले आहे.
कोल्हापूरच्या राजकारणात एक पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी भाजपचे कोल्हापूर शहरातील पदाधिकारी कुलदीप गायकवाड यांच्या बूथवर लावलेल्या डिजीटल फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विसर्जन मार्गावरील कोल्हापूर- बंगाली सुवर्ण कारागीर असोसिएशन यांच्या वतीने फलकावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आणि कुलदीप गायकवाड यांचे फोटो होते. पण त्या डिजीटल फलकावर शौमिका महाडिक यांच्या फोटोवर असलेल्या ” दिल्ली अब दूर नही” अशा मजकूराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सध्या या फलकाची चर्चा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहे.
आज माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्या नेत्यांनी जोपासायच्या असतात. कोल्हापूरच्या दोन्ही जागा ह्या शिवसेनेकडे असून जागावाटपामध्ये त्या शिवसेनेलाच मिळतील अशी अपेक्षा आहे. पण यासंबंधीचा निर्णय अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे करतील. त्यावेळी जे निर्णय होतील ते निर्णय आम्हा सगळ्यांनाच बंधनकारक आहेत. जर पक्षाने सांगितलं की लोकसभा लढवायची आहे तर महाडिक परिवार लोकसभाही लढवण्यास तयार आहे.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.