मुरगूड / वार्ताहर
मराठा आरक्षणासाठी कागल तालुक्यातील हळदवडे गावचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नामदेव भराडे यांनी गावकऱ्यांसोबत तब्बल ६ कि. मी. चा रणरणत्या उन्हात दंडवत घालत याप्रश्नी लक्षवेधी आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांसह मुरगूडकरांनी पाठिंबा दर्शवला. हळदवडे ते मुरगुड या मार्गावरील त्यांच्या दंडवताची दिवसभर चर्चा रंगली.
मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण स्थळी झालेल्या लाठी हल्ल्याचा प्रकारामुळे मराठा आंदोलनाने जोर पकडला. ठिकठिकाणी साखळी उपोषणे, रास्ता रोको, गाव बंद आंदोलने सुरू झाली. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून नामदेव भराडे यांनी त्यांचे सहकारी कृष्णात भराडे, प्रवीण भराडे, मारुती बैलकर या आपल्या सहकाऱ्यांसह जन्मगाव हळदवडे ते शिवतीर्थ मुरगुड हे ६ कि. मी. चे अंतर दंडवत घालत पार केले. यावेळी त्यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील पालिकेसमोर शिवतिर्थस्थळी सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत सुहास खराडे यांनी केले. यावेळी ओंकार पोतदार म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला धार मिळाली असून ही धगधगती ज्योत आरक्षण घेतल्याशिवाय थंड होणार नाही. बाळू भराडे यांनी आंदोलनकर्त्यांना उपहार वाटप केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नामदेव भराडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सावित्री भराडे, साताप्पा काशीद, आनंदा मोरे, संतोष इंदलकर, साताप्पा बैलकर, मयूर सावर्डेकर, दत्ता मंडलिक, सर्जेराव भाट, दीपक शिंदे, संकेत भोसले, नामदेव साळोखे, रणजीत मोरबाळे, धीरज गोधडे, पप्पू बारदेकर, जगदीश गुरव, संजय घोडके आदी उपस्थित होते.
चिमुकल्यांचा सहभाग!
तळपत्या उन्हामध्ये सुरू असलेल्या दंडवतामध्ये अवघ्या 10 वर्षाची रिया मोरे , श्रेयस इंदलकर आणि वेदांत बैलकर सगळी ही चिमुरडी मुले दंडवत घालत येथील शिवतीर्थ या ठिकाणी आली होती. ती सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली.