महालक्ष्मी मंदिराशेजारी असणाऱ्या ऐतिहासिक शेतकरी सहकारी संघाची इमारत नुकतीच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ताब्यात घेतली असून येणाऱ्या नवरात्रोत्सवात या ईमारतीचा वापर भाविकांसाठी करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासनाकडून सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला शेतकरी सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला असून जिल्हाधिकाऱ्यांना समोर करून शेतकरी संघाची इमारत हडप करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर शेतकऱी संघाचे सभासद आक्रमक झाले आहेत. संघाच्या सभासदांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. पालकमंत्री दिपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱी राहूल रेखावार यांच्या विरोधात “चले जाव”च्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या.
आंदोलनातील सभासदांनी शेतकरी संघाची इमारत हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप पालकमंत्र्यांवर केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत सुट्टीच्या दिवशी पत्रक काढून शेतकरी सहकारी संघ ताब्यात घेतल्याचा आरोपही शेतकरी संघाने केला. या मोर्चात अनेक शेतकऱी आपल्या बैलगाड्यांसह दाखल झाले होते तर महिलांचाही सहभाग उल्लेखनिय होता.