आज पर्यंत 10 हजार लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. पण माझ्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही. प्रस्थापितांनीही माझ्या सारख ठामपणे सांगावं असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना अप्रत्यक्षपण केले आहे.
कागलमध्ये आज शासन आपल्या दारी या धरतीवर समरजित आपल्या दारी या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून त्यांनी आज आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पहा VIDEO >>>बदल हवा तर आमदार नवा! समरजितसिंह घाटगेंनी पुन्हा मुश्रीफांना डिवचले
मुश्रीफ यांचा पराभव करूनच आमदार होईन, असा विडा घाटगे यांनी उचलल्यानंतर पुन्हा समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना डिवचले आहे. मुरगुड येथे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चला संकल्प करूया…७५ हजार लाभार्थ्यांना लाभ देऊया’ उपक्रमांतर्गत ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियानावेळी त्यांनी मुश्रीफांवर तोफ डागली.
कागल विधानसभा मतदारसंघामध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात संघर्ष अटळ आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप एकत्र असेल किंवा नसेल, पण मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगे यांनी रणशिंग फुंकले आहे त्यामुळे कागलची लढत चुरशीची होणार हे नक्की!
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. कोल्हापूर लोकसभा, विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र चाचपणी सुरू केली आहे. सर्व शक्यता गृहीत धरूनच सर्वांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे.