ब्राझीलमधील डेफ ऑलिंपिक जलतरण स्पर्धेत विविध खेळात 16 पदके, ताहिरकडून खेळाडूंच्या सह्या असलेला टी-शर्ट मोदींना भेट
कोल्हापूर प्रतिनिधी
पॅग्झीयस दो सुल (ब्राझील) येथे नुकत्याच झालेल्या 24 व्या डेफ ऑलिंपिकमधील विविध खेळांमध्ये 8 सुवर्ण, 1 रौप्य व 7 कांस्य पदकांची कमाई केलेल्या भारतीय संघातील महिला व पुरुष खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करुन सत्कार करण्यात आला. याचबरोबर कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सुबिया मुल्लाणी व ताहिर मुल्लाणी या दोघांनीही डेफ ऑलिंपिकमध्ये भारतीय जलतरण संघातून प्रतिनिधीत्व करत उल्लेखनिय ठसा उमटवल्याबद्दल त्यांचाही मोदींनी गौरव केला. यावेळी ताहिरने ऑलिंपिकमधील पदकप्राप्त खेळाडूंच्या सह्या असलेला भारतीय संघाचा टी-शर्ट मोदी यांना भेट दिला.
डेफ ऑलिंपिकमध्ये दैदिप्यमान कामगिरी करत 16 पदकांची लयलुट करुन भारतीय संघ नुकताच मायदेशी परतला. या संघाच्या कामगिरीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. त्यानुसार सर्व खेळाडूंना शब्बासकीची थाप देण्यासाठी दिल्लीतील मोदींच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर, दिल्ली राज्य खेलमंत्री प्रामाणिक कश्चप हेही उपस्थित होते. वैशिष्ठय़ म्हणजे या कार्यक्रमासाठी डेफ ऑलिंपिकअंतर्गत झालेल्या जलतरण स्पर्धेतील उल्लेखनिय कामगिरीबद्दल सुबिया व ताहिर या दोघांनाही बोलवण्यात आले होते. यावेळी मोदी व ठाकूर यांनी सुबिया, ताहिर यांच्यासह सर्व पदक प्राप्त खेळाडूंशी संवाद साधत डेफ ऑलिंपिकमधील त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली. शब्बासकीची थाप देत भारताचे नाव सतत उंचावत ठेवा, असा आशिर्वादही खेळाडूंना दिला. तसेच डेफ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू हे माझे ऊर्जातंत्र आहेत, असे मोदी यांनी ट्विट करून खेळाडूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, 1 ते 15 मे या कालावधीत झालेल्या डेफ ऑलिपिंकमध्ये भारताची पहिली महिला जलतरणपटू म्हणून कोल्हापूरच्या सुबियाने भारतीय संघातून प्रतिनिधीत्व केले होते. शिवाय तिने ऑलिंपिकअंतर्गत झालेल्या जलतरण स्पर्धेच्या 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पाचवा क्रमांक मिळवून भारताचे नाव पाच जणांच्या यादीत झळकवले. याचबरोबर 4 बाय 100 फ्रिस्टाईल मिक्स रिलेमध्ये सुबिया व तिचा सख्खा भाऊ ताहिर याचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने जगभरातील जलतरणपटूंच्या तुलनेत वेगवान जलतरण करत पाचवा पटकावला. तसेच 4 बाय 100 मीटर मिक्स मिडले या प्रकारातही सुबिया व ताहिर या दोघांचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने सहावा क्रमांक मिळवला. जमेची बाजू म्हणून डेफ ऑलिंपिकमध्ये पहिली भारतीय महिला जलतरपणपटू म्हणून प्रतिनिधीत्व केल्याबद्दल ऑलिंपिककडून सुबियाचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.