विनोद सावंत, कोल्हापूर
Kolhapur Municipal Corporation News : महापालिकेला शहरातील 104 धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे लागणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी कोल्हापूर महापालिकेला आदेश दिले असून त्यानुसार याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.दरम्यान, महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतीवर थेट कारवाईची धडक मोहीम राबविली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत राज्यातील सर्वच महापालिकांनी धोकादायक इमारतींचे चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे.गृहनिर्माण सोसायट्यांच्या अहवालावर अवलंबून राहू नये.यामुळे भविष्यातील जीवितहानी टाळता येईल.स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची निवासाची काळजीही घेण्यात यावी. जेणेकरून ते धोकादायक इमारतीतून बाहेर पडण्यासासाठी तयार होतील,असेही आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.यानुसार महापालिकेने मंगळवारपासून कार्यवाही सुरू केली. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाने दोन धोकादायक इमारतींवर कारवाई केली.शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी चारही विभागीय कार्यालयांच्या उपशहर अभियंता विभागनिहाय धोकादायक इमारतींचे आठ दिवसांत स्ट्रक्टचर ऑडीट करून रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत.एकूणच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेची यंत्रणा शहरातील धोकादायक इमारतींबाबत खडबडून जागी झाली आहे.
विभागीय कार्यालय धोकादायक इमारती पाडलेल्या इमारती दुरूस्त केलेल्या इमारती
गांधी मैदान 4 0 0
शिवाजी मार्केट 141 70 20
राजारामपुरी 20 9 4
ताराराणी मार्केट 21 3 5 मध्ये कोणीही राहत नाही.
एकूण 186 82 29
विभागीय कार्यालय कोर्ट केस इमारती उतरविणे बाकी असलेल्या इमारती
गांधी मैदान 3 3
शिवाजी मार्केट 5 46
राजारामपुरी 0 7
ताराराणी मार्केट 0 13
कुळ-मालकाच्या वादात मिळकत धोकादायक
शहरातील गावठाण भागात अनेक जुन्या इमारती आहेत.यामध्ये बहुतांशी धोकादायक इमारतींचा समावेश आहे.येथे कुळ आणि मालक वाद न्यायालयात गेला आहे.कुळाकडून व्यवसाय केले जात असून शॉर्ट सर्कीट होऊन आगीच्या घटना घडल्या आहेत.कुळ-मालकाच्या वादामुळेच धोकादायक इमारतीवर कारवाईस मर्यादा येत आहे.
महापालिकेचे स्ट्रक्चरल इंजिनिअरांचे पॅनेल आहे.मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार शहरातील धोकादायक इमारतींचे चारीही विभागीय कार्यालयांतर्गत आठ दिवसांत पॅनेलवरील इंजिनिअरांमार्फत स्ट्रक्चचरल ऑडीट करून घेतले जाणार आहे. तशा सूचना उपशहर अभियंतांना दिले आहे.
हर्षजित घाटगे,शहर अभियंता, महापालिका
विभागीय कार्यालय दोन शिवाजी मार्केट अंतर्गत अतिधोकादायक इमारतींवर कारवाई केली जात आहे. महाद्वार रोडवरील 18 धोकादायक इमारतींचे मालक-कुळ यांना भेटून धोकादायक भागाचे दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात मनपाचे सहकार्य राहिल,असेही त्यांना कळवले आहे.
नारायण भोसले, उपशहर अभियंता
नोंदणी कमी, धोकादायक इमारती जास्त
मनपाकडे 186 धोकादायक इमारतीची नोंद आहे.मात्र, शहरात प्रत्यक्षात 300 हुन अधिक अतिधोकादायक इमारती दिसून येतात.काही मिळकतींची नोंद महापालिकेकडे झालेली नाही.यामध्ये अतिधोकादायक,धोकादायक इमारतींचाही समावेश आहे.