प्रशासनाचा ग्रामपंचायतीला क्यू आर कोड काढण्याचा आदेश, ऑनलाइन पेमेंट होणार तत्काळ जमा
असळज वार्ताहर
कोल्हापूर जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये क्यू आर कोड काढण्यात येत आहे. ग्रामपंचायतीचा घरफाळा व पाणीपट्टी भरणाऱ्या धारकांना ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन कॅश देण्यात येते. परंतु माझ्या फोनच्या अॅपमध्ये पैसे असून तुम्हाला फोन पे, गुगल पे करता येत नाहीत, अशी कारणे अनेक वेळा ग्रामपंचायत कर्मचारी व प्रशासनाला ऐकावयास मिळत होती. परंतु आता सर्वच ग्रामपंचायतीमध्ये क्यू आर कोड असल्याने तत्काळ बँकेच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया असणारी ग्रामपंचायतीमध्ये चेक सुविधा व रोख सुविधा उपलब्ध होती. परंतु आता क्यू आर कोड आल्याने मिळकतधारकांना फोनमधून ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये पैसे जमा करता येणार आहेत. यासाठी जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीना क्यू आर कोडची सक्ती केली असून नागरिकांच्या व प्रशासनाच्या दृष्टीने ते सोयीस्कर असणार आहे .जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या प्रशासनाची क्यू आर कोडसाठी धावपळ असून जिल्हा बँकेकडून व राष्ट्रीय बँकेकडून मोलाची मदत करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीच्या खात्यावर तात्काळ महसूल जमा होण्यास मदत
मिळकतधारकांना पेमेंट सिस्टीममध्ये क्यु आर कोडचा वापर करता येणार आहे.. रोख किंवा कार्डांची गरज न पडता, जलद आणि सहज पेमेंटसाठी हे स्कॅन करून पेमेंट केले जाणार आहे. मोबाइल पेमेंट सिस्टीममध्ये वापरले जाणार आहे. जसे की आपल्याकडील गूगल पे, फोन पे, ई. आता ग्रामपंचायतीमध्ये क्यु आर कोड असणार आहेत. ते याच कारणासाठी ज्याला पेमेंट करायचे आहे तो स्कॅन करून सहजपणे पैसे पाठवू शकणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या खात्यावर तात्काळ महसूल जमा होण्यास मदत होणार आहे.
प्रसाद झोरे ग्रामसेवक निवडे/वेतवडे ता. गगनबावडा