राजेंना बायपास करुन शिवसैनिकाला पसंती; मराठा निष्ठावंताचे वापरले कार्ड
कोल्हापूर : संतोष पाटील
युवराज संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची खासदारकी देताना भाजपने आखलेले राजकीय मनसुबे फसले. तरीही मराठा समाजाचे खमके नेतृत्व म्हणून संभाजीराजे यांना भाजपने आडकाठी घातली नाही. भाजपचा हा अनुभव पाठीशी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने संभाजीराजे यांच्यासाठी राज्यसभेच्या वाटेत पक्षीय अट घालत राजकीय मोर्चेबांधणी केली. सत्तेचे व पदाचे राजकारण हे नेहमीच वेगळे असते, गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडीनंतर याचा अनुभव संभाजीराजेंना आला. शिवबंधनातून निसटू पाहणाऱ्या संभाजीराजे यांना बायपास करत शिवसेनेने अखेर संजय पवार यांची उमेदवारी जाहीर करत मराठा कार्ड तर वापरलेच याशिवाय प्रामाणिक शिवसैनिकाचा शिवसेनेत योग्यवेळी सन्मान होतोच, हाही संदेश यानिमित्ताने दिला.
एखद्या मुरब्बी डावपेची राजकारण्यापेक्षा संभाजीराजे यांचा राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणवर भर राहिला आहे, हे वास्तव आहे. सरळमार्गी व स्पष्ट बोलणारे अशी वैशिष्ठे असलेल्या संभाजीराजे यांना राजकीय पटावरील अडीच घरांच्या खेळी समजत नाहीत असेही नाही. मात्र, आपली राजकारणाची आणि समाजकारणाची चौकट त्यांनी आखली होती. मराठासह बहूजन समाजासाठी काम करत असताना राजकीय व्यासपीठ टाळले होते. तरीही भाजपने राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून नेमणूक केली. महाराष्ट्रात नाही तर उत्तरप्रदेशातील राजकारणात संभाजीराजे यांचा उपयोग होईल, अशी भाजपच्या थिंकटँकची अटकळ होती. राज्यसभेच्या दुसऱ्या टर्मवेळी शांत राहून भाजपने आपली मान सोडवून घेतली. राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर करताना संभाजीराजे यांनी पक्षीय झुल नाकारली. मराठा समाजाचे संघटन आणि शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून संभाजीराजे यांनी राज्यात एकफळी निर्माण केली आहे. आजी-माजी सत्ताधायांवर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने दबावतंत्र निर्माण केले आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्यानिमित्ताने निर्माण केलेल्या दबावातून आपली मान सोडवून घेण्यासाठी सर्वपक्षीय नेतृत्व संधी शोधत होते, असाही या घडामोडींचा अर्थ होतो.
राजकारणात नेहमी स्पष्ट भुमिका घेणाऱ्या संभाजीराजे यांनी पहिल्या दणक्यातच आपल्या अटी शर्थी स्पष्ट केल्या. पक्षीय चौकटीत न अडकता राज्यसभेवर अपक्ष म्हणून सर्वपक्षीयांनी पाठींबा द्यावा, असे जाहीर केले. संभाजीराजेंना निवडून आणणे ही सर्वपक्षीयांची राजकीय गरज असल्याचे चित्र निर्माण केले गेले. राज्यसभेची सहावी जागा जी काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपच्या पाठींब्याशिवाय निवडून येवू शकत नाही. शिव-शाहूंचे वंशज आणि मराठा समाजाचे पाठबळ यामुळे सर्वपक्षीय नेते नमतील अशी यामागे भूमिका होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठींबा जाहीर करुन कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू सहावी जागा शिवसेनेच्या पारड्यात टाकत राष्ट्रवादीने घुमजाव केले. तर दुसऱ्या बाजूने संभाजीराजेंना शिवबंधन बांधले तरच उमेदवारी अशी अट मातोश्रीने घातली. यातून त्यांची कोडी करण्याचा प्रयत्न झाला. मातोश्रीचा निरोप धुडकावत संभाजीराजे थेट कोल्हापुरीला निघून आले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप मात्र यासर्व घडामोडीकडे मुकपणे पहात होती.
संभाजीराजे पक्षीय बंधनात न अडकल्यास शिवसेनेचा पर्यायाने महाविकास आघाडीचा प्लॅन बी तयार होता. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यापूर्वी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून मराठा समाजासाठी काम केले आहे. मागील तीन दशकाच्या त्यांच्या राजकीय वाटचालीत ते शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत. कोल्हापूरच्या संस्थानातील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेने संजय पवार यांचे मराठा कार्ड संभाजीराजे यांच्या विरोधात अनपेक्षितपणे बाहेर काढले. संजय पवार यांना उमेदवारी देत, पक्षात कामाची कदर होतेच हा संदेश सर्वसामान्य शिवसैनिकांत दिला. यानिमित्ताने सेना नेतृत्वाने पक्षीय मोट अधिक घट्ट केली.
शिवसेनेचे धक्कातंत्र
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या राज्यातील सत्ताकारणात राज्याचे नेतृत्व हातात असूनही सेना बॅकफुटवर असल्याचा न्युनगंड सर्वसामान्य शिवसैनिकात आहे. 1995 आणि 2014 युती शासनाच्या तुलनेत सत्तेची फळे चाखताना दिग्गज वाटेकरी वाढल्याने शिवसैनिकांच्या अडणीत वाढत होत्या. संभाजीराजे यांना डावल्याचे राजकीय फटका बसू नये यावर उतार म्हणून मराठा कार्ड, कोल्हापुरच्या मातीतील उमेदवार देवून शिवसेनेने राजकीय निरीक्षकांना आचंबित केले. सेना नेतृत्व सत्तासोपानावर असूनही सर्वसामान्य शिवसैनिकांकडे लक्ष आहे. प्रामाणिकपणे काम करणाया शिवसैनिकांचे राजकीय कल्याण सेना नेतृत्व करतेच हा संदेश संजय पवार यांच्या उमेदवारीवरुन देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेची पक्षीय उतरंड पाहता, संजय पवार यांची उमेदवारी सामान्य शिवसैनिकांना स्फूर्तीदायक ठरणारी आहे.