कुरुंदवाड प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील आलास येथील समाधान हॉटेल मध्ये ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरून वादविवाद होऊन दोघांच्यावर धारदार कटरने हल्ला झाला होता यामध्ये औरवाड येथील ओंकार माने हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज शनिवार दिनांक 21 मे रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे औरवाड गावात सध्या तणावपूर्ण वातावरण असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या मारामारीच्या प्रकरणातील संशयित आरोपी ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार दोघे (रा.शिकलगार वसाहत, कुरुंदवाड) कुलदीप संकपाळ (रा. शेडशाळ) या तिघांच्या विरुद्ध 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी दिली.
17 मे रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आलास तालुका शिरोळ येथील हॉटेल समाधान येथे संशयित आरोपी ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार, कुलदीप संकपाळ हे तिघे व अमीन मोहम्मद पटेल, ओंकार माने हे त्या हॉटेलमध्ये जेवत होते यावेळी एकमेकाचा धक्का लागल्याने वाटीतील रस्सा सांडलयाच्या कारणावरून बाचाबाची व वादावादी झाली या घटनेचे रूपांतर शिवीगाळ व मारामारीत झाले. यावेळी माने व पटेल यांच्यावर संशयित आरोपींनी कटरने वार करून गंभीर जखमी केले.यानंतर त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यातील जखमी ओंकार माने याचा आज शनिवार दिनांक 21 रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.