जयवंत हारूगले महानगरसमन्वयक, किशोर घाटगे उपजिल्हाप्रमुख तर रणजित जाधव शहरप्रमुखपदी नियुक्त
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाच्या कोल्हापूर शहर कार्यकारणीतील प्रमुख पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. महानगरप्रमुखपदी शिवाजी जाधव, महानगरसमन्वयकपदी जयवंत हारुगले, उपजिल्हाप्रमुखपदी किशोर घाटगे तर शहरप्रमुखपदी रणजीत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.
नियुक्ती झालेल्यांपैकी शिवाजी जाधव यांनी कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख पदाची जबाबदारी पार पाडली आहे. जयवंत हारुगले हे कोल्हापूर उत्तर शहरप्रमुख होते. किशोर घाटगे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. रणजीत जाधव हे उपशहरप्रमुख पदावर कार्यरत होते. शिवसेनेचा बुलंद आवाज अशी त्यांची शिवाजी पेठ परिसरात ख्याती आहे. आगामी काळात उर्वरित प्रमुख पदांसह उप-शहरप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी, युवासेना आदी सर्वच अंगीकृत संघटनावर पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या करून, निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्यात येणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.
दिघे यांच्या पुण्यतिथीदिनी घोषणा
धर्मवीर पदवी लाभलेले शिवसेना नेते आनंद दिघे यांची शुक्रवारी पुण्यतिथी होती. त्यांना अभिवादन करत राजेश क्षीरसागर यांनी शहर कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकाऱयांच्या निवडी जाहीर केल्या. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच जिल्हाप्रमुखपदी सुजित चव्हाण आणि रविंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.