कोल्हापूर प्रतिनिधी
वडणगे फाटा येथून कोल्हापूर शहराकडे दुचाकीवऊन निघालेल्यांपैकी तिब्बल सिटपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने अचानक शिवाजी पुल रस्त्यावर उडी मारली. यावेळी पाठीमागून येणार्या टेंपोखाली सापडून त्याच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. जसीम मनीजर अन्सारी (वय 28 सध्या रा. साळोखे पार्क, मूळ रा. झारखंड) असे या मृत फरशी फिटींग कामगाराचे नाव आहे. गुऊवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामुळे तासभर या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. याबाबत रात्री उशिरा सीपीआर पोलीस चौक येथे नोंद झाली.
याबाबत घटनास्थळ व पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, वडणगे फाटा येथून तिघे तरुण एकाच दुचाकीवर बसून तिब्बल सिट कोल्हापूर शहरात येत होते. शिवाजी पुलावर आल्यानंतर पुढे पोलीस असतील दंड होईल या भितीने दुचाकी चालकाने पाठीमागे बसलेल्या तरुणास उतरण्यास सांगितले. यावेळी पाठीमागील तरुण उडी मारून उतरताना त्याची पॅन्ट दुचाकीच्या हुकात अडकून तो डोक्यावर पाठीमागे पडला. यावेळी पाठीमागून येण्राया टेम्पोचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. यावेळी घाबरलेले मृत कामगाराचे सहकारी घटनास्थळावऊन पळून गेले. मृत तरुणाच्या खिशात बांधकामावर मापे घेण्यासाठी लागणारा टेप होता. मात्र इतर कागदपत्रे नसल्याने त्याची ओळख पटली नव्हती. अपघाताची माहिती समजल्यावर करवीर व लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले.मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सीपीआर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. हा कामगार आंबेवाडी येथे फरशी फिटींगच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेला होता, असे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान शिवाजी पुलावर अपघात झाल्यानंतर तोरस्कर चौकापासून ते आंबेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलीसांनी तासाभरात वाहतूक सुरळीत केली.