सैन्य दलाचे खासगीकरण खपवून घेणार नाही : केंद्र सरकारला इशारा
प्रतिनिधी/कोल्हापूर
अग्निपथ योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार भारतीय सैन्य दलाचे खासगीकरण करत असल्याचा गंभीर आरोप करत ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी येथील शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात तीव्र निदर्शने केली. सैन्य भरतीचे खासगीकरण बंद करा, नोकरी आमच्या हक्काची नाही…कोणाची बापाची, अग्निग्नपथ योजना मागे घ्या, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसर दणाणून सोडला.
केंद्र सरकारने सैन्य भरतीमध्ये अग्निपथ योजना घोषित केल्यानंतर देशभरातील युवक आक्रमक झालेत. विरोधात रस्त्यावर उतरू लागले आहेत. केवळ चार वर्ष नोकरी करून अनेक युवक बेरोजगार राहणार आहेत. या खासगीकरणाच्या विरोधात ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. शिवाजी विद्यापीठातील सैन्य भरती तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठय़ा संख्येने या निदर्शनात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना युथ फेडरेशनचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे म्हणाले, युवकांना विश्वासात न घेता सैन्यदलाचे खासगीकरण करण्यासाठी अग्निपथ योजना आणली आहे. स्वयंम घोषित देशभक्तीचे गोडवे गाणारे, अदाणी, अंबानीला दत्तक गेलेले भाजप सरकार आपले मंत्री अमित शहाच्या मुलाला कोणत्याही कुवतीशिवाय बीसीआयचे अध्यक्ष करते व गरिबांच्या मुलांना कंत्राटी काम लावते. अग्निग्नपथ योजना सरकारने मागे न घेतल्यास युवक भाजप सरकारला सत्तेतून बेदखल करतील.
युथ फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी जावेद तांबोळी यांनी देशात खूप मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी असताना नियमित सैन्य भरती न करता सैन्य भरतीचेच खाजगीकरण केले जात आहे. ही योजना मागे न घेतल्यास युवकांच्या रोषाला सरकारला सामोरं जावे लागेल असा इशारा दिला. निदर्शनात रवी जाधव, अमर पाटील, संतोष वासेकर, शेजल सुनील, उत्कर्षा साळुंखे. यांच्यासह युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
दमिरा राकेशला आंदरांजली
अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करताना तेलंगणाचा युवक दमिरा राकेश हुतात्मा झाला. त्याला निदर्शानावेळी आदरांजली वाहण्यात आली.
सोमवारी दसरा चौकात युवकांचा मोर्चा
अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी येत्या सोमवार 21 जून रोजी दसरा चौकातून युवकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता या मोर्चाला प्रारंभ होईल. निदर्शनावेळी या मोर्चात युवकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युथ फेडरेशनच्या वतीने करण्यात आले.