परीक्षेसाठी ड्रेसकोडचे पालन आवश्यक; पहिल्या सत्रात 2541 उमेदवार देणार परीक्षा
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाची (वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) विविध विभागाकडील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची शासनाकडून प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आय.बी.पी.एस. कंपनीकडून पहिल्या सत्राचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून 7, 8, 10 व 11 ऑक्टोंबर 2023 रोजी 4 संवर्गाचे पेपर होणार आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवून गैरमार्गांचा अवलंब करू नका. कोणी पैशाची मागणी करत असेल, तर तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्राच्या पहिल्या भागात परीक्षा केंद्राचा तपशिल, उपस्थित राहणेची वेळ इत्यादी बाबी व भाग दोन मध्ये उमेदवारांना महत्त्वाच्या सुचना दिलेल्या आहेत. सर्व उमेदवारांनी प्रवेशपत्राचे दोन्ही भाग डाऊनलोड करुन त्यावर त्यांचा अलिकडचा किंवा अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिकटवून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी स्वत: सोबत त्यांची ओळख पटवण्याकरीता परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र आणि सध्या वैध अशा (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र आदी) ओळखीच्या पुरवाव्याची मुळ प्रत व त्याची एक छायांकित प्रत आणणे गरजेचे आहे. रेशनकार्ड किंवा वाहन चालक शिकाऊ परवाना या परीक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा म्हणून स्विकारला जाणार नाही. मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा रंगीत झेरॉक्स सादर केल्यास तो ग्राहय धरला जाणार नाही. अशा उमेदवारास परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात येईल. दिव्यांग परीक्षार्थीनी दिव्यांग प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच जे दिव्यांग परीक्षार्थी शारीरिकदृष्ट्या पेपर देऊ शकत नाहीत, त्यांना जि.प.कडून राईटर दिले जाणार असल्याचे सीईओ पाटील यांनी स्पष्ट केले.
जिह्यात पाच केंद्रांवर होणार परीक्षा
जिह्यात पाच केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षार्थींना त्यांची परीक्षा कोणत्या केंद्रावर होणार आहे, याची माहिती त्यांच्या हॉल तिकीटवर मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 2541 जण परीक्षा देणार आहेत. फ्रिस्किंग परीक्षा केंद्रावर उमेदवारांची झडती घेतली जाणार असून त्यासाठी उमेदवारांनी ड्रेस कोडचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार परीक्षार्थींनी फुल हाताचा शर्ट त्याच बरोबर बुट घालून येऊ नये. हाफ हाताचा शर्ट आणि स्लीपर किंवा सँडलचा वापर करणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळेपूर्वी तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही. कोणताही गैरप्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली आहे. परिक्षार्थी अथवा त्यांच्या पालकांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा परिषदेच्या मदत कक्षाशी संपर्क साधावा. त्यासाठी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत मदत कक्ष सुरू केले असून तेथे स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या 0231-2655416 या क्रमांकावर संपर्क साधावा असे सीईओ पाटील यांनी सांगितले.
पैशांची मागणी केल्यास पोलीसांत तक्रार करा
परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात असून गैरप्रकार करण्यासाठी कोणताही वाव नाही. या भरती प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधी अथवा जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोणताही थेट संबंध नाही. त्यामुळे कोणी पैशाची मागणी करत असेल तर त्याबाबत पोलिसांकडे किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडे थेट तक्रार करावी असे आवाहनही सीईओ पाटील यांनी केले. पत्रकार परिषदेला सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव उपस्थित होते.
पहिल्या सत्रातील परीक्षेचे वेळापत्रक
परीक्षा दिनांक पदाचे नाव वेळ
7।10।2023 रिंगमन सकाळी 11 वाजता
वरीष्ठ सहाय्यक लेखा दूपारी 3 वाजता
8।10।23 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) दूपारी 3 वाजता
10।10।23 विस्तार अधिकारी (कृषि) सकाळी 11 वाजता
आरोग्य पर्यवेक्षक दूपारी 3 वाजता
11।10।23 लघुलेखक (निम्न श्रेणी) सकाळी 7 वाजता
लघुलेखक (उच्च श्रेणी) सकाळी 11 वाजता
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) दूपारी 3 वाजता