मागासवर्गीय विद्यार्थी सायकल खरेदीसाठी 10 लाखांची तरतूद
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक व सामुहिक योजनांच्या साहित्याची तपासणी करा असे निर्देश जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी समाजकल्याण समिती सभेत दिले.
समाजकल्याण विभागामार्फत गावोगावी राबविण्यात आलेल्या वैयक्तिक व सामुहिक योजनांची जिल्हा परिषेदेच्या वेगवेगळया यंत्रणेमार्फत तपासणी करून लाभार्थीनी सदरचे साहित्य खरेदी करून वापरात ठेवले आहे अगर कसे, तसेच सामुहिक योजनेअंतर्गत सदरचे काम समाजकल्याण विभागाने निर्देशीत केलेल्या वस्तीतच झाले आहे का ? तसेच त्याचा दर्जा कसा आहे ? याबाबत तपासणी करून सदर कामामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक चव्हाण यांनी दिले. यावेळी समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हेते.
सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या अवघड क्षेत्रातील शाळेमधील मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थीनींना सायकल देण्यासाठी 10 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेअंतर्गत पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्याची छाननी करावी व सायकल कंपनीशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना मजबूत व टिकाऊ सायकल बाबतच्या दराबाबत निश्चिती करावी. दिव्यांग शाळेच्या कार्यशाळेमध्ये कागदी लगद्यापासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती, गौरी मुखवटे, बैल याबरोबरच इतर खेळणी बनविण्यासाठी लागणारे यंत्र तसेच शिलाई मशिन, लॅमिनेशन मशिन, ट्रम्पोलीन स्पायरल बाईंडींग मशिन, मेणबत्ती बणविण्याचे मशिन, पक्षांची घरटी बणविण्यासाठी लागणारे साहित्य सन 2022-23 मधील तरतूदीमधून पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.