मनरेगा योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी जि.प.मध्ये झाली बैठक; बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
प्रतिनिधी कोल्हापूर
राज्यात मनरेगा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाश्वत विकासकामे झाली आहेत. मग सधन समजला जाणारा कोल्हापूर जिल्हा ही योजना राबविण्यामध्ये पिछाडीवर का राहिला आहे ? जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेबाबतची नकारात्मक दृष्टीकोन बाजूला ठेवून सकारात्मकरित्या ही योजना तळमळीने राबवून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या.
बीड जिल्ह्यात मनरेगा योजनेची सर्वाधिक कामे झाली आहेत. बीड जिल्ह्यात ही योजना कशा पद्धतीने यशस्वीरित्या राबवली जात आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी शुक्रवारी बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांच्यासह काही अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषदेत बोलावले होते. यावेळी त्यांनी मनरेगा योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती सांगितली. तसेच योजनेचा आराखडा कशा पद्धतीने निश्चित केला पाहीजे याबाबतची साईट डेव्हलप् करण्यासाठी बीडच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. मनरेगा योजनेतून गावठाणाबाहेर ६० टक्के निधी खर्च करून ४० टक्के निधी गावांत खर्च करणे बंधनकारक आहे. त्यानुसार गावठाणातील आणि गावठाणाबाहेरील विकासकामांचा आराखडा तयार करून त्यानुसार गावागावांतील कामे मार्गी लावावीत अशा सूचनाही सीईओ चव्हाण यांनी दिल्या.
अनेक योजना संयुक्तपणे राबवा मनरेगा योजनेसोबतच १५ वित्त आणि स्वच्छ भारत मिशन योजनांचा निधी एकत्रितपणे खर्च करून गावांत प्रभावीपणे विकासकामे राबविता येतात. त्यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मकदृष्ट्या विचार करून संयुक्तपणे योजना राबवाव्यात असे आवाहन सीईओ चव्हाण यांनी केले.