डॉ. अनिल पाटील : हलगा येथे पुतळ्याचे अनावरण
बेळगाव : भरतेश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 60 वर्षांपूर्वी बेळगाव परिसरात शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या कोमलण्णा दोड्डाणावर यांची शैक्षणिक सेवा अविस्मरणीय आहे. कठीण काळात त्यांनी संस्था उभारून आव्हानांना तोंड दिले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1918 मध्ये महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडविली तशीच क्रांती कोमलण्णा यांनी कर्नाटकात घडविली, असे विचार सातारा येथील शिक्षणतज्ञ व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी मांडले. हलगा येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कोमलण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी म्हणाले, कोमलण्णांनी शिक्षणाला प्राधान्य देत शिक्षण संस्था उभारल्या. ते राजकारणात असले तरी सत्तेची अपेक्षा त्यांना नव्हती. प्रकाश हुक्केरी यांना आमदारकी द्या असे सांगून त्यांनी माझ्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केल्यामुळेच मी आमदार झाल्याचे हुक्केरींनी सांगितले. भरतेश शिक्षण संस्थेला दरवर्षी 25 लाख रु. अनुदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ए. ए. सनदी यांनी लिहिलेल्या भरतेश बेळकु पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी भरतेशचे अध्यक्ष डॉ. जिनदत्त देसाई, संचालक प्रकाश उपाध्ये, कोषाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे, विनोद दो•ण्णावर, भूषण मिरजी आदी उपस्थित होते.