वृत्तसंस्था/ येओसू (कोरिया)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे कोरिया खुल्या सुपर 500 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांत चालू वर्षीच्या बॅडमिंटन मौसमातील पहिले जेतेपद मिळविण्यासाठी आपल्या मोहिमेल प्रारंभ करतील.
2023 च्या बॅडमिंटन हंगामातील 50 टक्के हंगाम संपुष्टात आला असला तरी पीव्ही सिंधूला अद्याप एकाही स्पर्धेत विजेतेपद मिळविता आलेले नाही. दुखापतीमुळे तब्बल 5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर तिने बॅडमिंटन क्षेत्रात आपले पुनरागमन केले आहे. आतापर्यंत दोन वेळेला ऑलिम्पिक पदक मिळविणारी पीव्ही सिंधू हिने अलिकडेच झालेल्या माद्रीद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच तिने कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. अलिकडेच झालेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चीनच्या गेओ जी ने उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा पराभव केला होता. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा सलामीचा सामना चीन तैपेईच्या पेई पो बरोबर होणार आहे. पुढील वर्षीच्या एप्रिल अखेरिस ऑलिंपिक पात्रता कालावधी संपुष्टात येणार आहे. तत्पुर्वी पीव्ही सिंधू सूर मिळविण्यासाठी झगडत आहे.
2021 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या किदांबी श्रीकांतला 2023 च्या बॅडमिंटन हंगामात आतापर्यंत म्हणावे तसे यश मिळालेले नाही. दरम्यान त्यांनी स्पेन मास्टर्स, मलेशिया मास्टर्स आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतचा सलामीचा सामना जपानच्या मोमोटाशी होणार आहे. भारताच्या लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांनी यावर्षी अनुक्रमे कॅनडा आणि मलेशियातील 500 दर्जाच्या सुपर बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या आहेत. लक्ष्य सेनचा कोरिया स्पर्धेतील सलामीचा सामना डेन्मार्कच्या अँटोनसेनशी तर प्रणॉयचा सामना भारताच्या समीर वर्माशी होत आहे. कोरिया बॅडमिंटन स्पर्धेत सर्वांचे लक्ष्य भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीवर राहिल. या जोडीने इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तसेच स्विस खुल्या सुपर 300 दर्जाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. महिला एकेरीत आकर्षि कास्यंप आणि मालविका बनसूद भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.