सर्व 162 प्रवासी सुरक्षित ः धावपट्टीवरून घसरले विमान
मनिला / वृत्तसंस्था
फिलिपाईन्समध्ये सोमवारी मोठा विमान अपघात टळला. कोरियन एअरचे विमान सोमवारी फिलिपाईन्समधील विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरल्याने दुर्घटना घडली. मात्र, विमानाची गती कमी असल्यामुळे ते गवताळ जमिनीत अडकल्याने सर्व प्रवासी सुरक्षित राहिले. या दुर्घटनेवेळी विमानात 162 प्रवासी होते. या घटनेत विमानाचेही नुकसान झाले आहे. फिलिपाईन्स विमानतळ प्राधिकरण या घटनेची अधिक चौकशी करत आहे. पावसाचे पाणी साचून धावपट्टी निसरडी झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याप्रकरणी कोरियन एअरच्या अध्यक्षांनी प्रवाशांकडे दिलगिरी व्यक्त करत भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पावले उचलण्याचा संकल्प केला.
कोरियन एअरचे विमान फिलिपिन्स विमानतळावर धावपट्टीवरून घसरल्यानंतर गवताळ कुरणात अडकले. सुदैवाने याप्रसंगी विमानातील 162 प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्सपैकी कोणीही जखमी झाले नाही. विमानातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजाचा वापर करावा लागला. या दुर्घटनेनंतर देशातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या मॅकटन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सदर धावपट्टी लँडिंगसाठी बंद करण्यात आली.
कोरियन एअरलाईन्सची दिलगिरी
आम्ही नेहमी आमच्या उड्डाणांमध्ये सुरक्षेला प्राधान्य देतो आणि आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयींबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे कोरियन एअरचे अध्यक्ष वू केहॉन्ग यांनी एका निवेदनात म्हटले आहे.