बेळगाव : अर्जुन स्पोर्ट्स क्लब आयोजित बेळगाव प्रिमियर लिग टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेन शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातूनस्पोर्ट्स ऑन संघाने सिग्नेचर संघाचा 30 धावांनी, के. आर. शेट्टी किंग्ज संघाने तनय स्पोर्टींगचा 8 गड्याने तर मोहन मोरे संघाने शिवनेरी लायन्स संघाचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. संतोष सुळगे पाटील, मदन बेळगावकर व अब्बस हुद्दार यांना सामनावीर तर प्रशांत मुतगेकर, अभिजित पाटील, भीमा तलवार यांना इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम जुबिली मैदानावर आयोजित बेळगाव प्रिमियर लिग स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात स्पोर्ट्स ऑन संघाने 10 षटकात 8 बाद 86 धावा केल्या. त्यात संतोष सुळगे-पाटीलने 2 षटकार, 3 चौकारांसह 24 चेंडूत 40, राजू मुजावरने 1 षटकार, 2 चौकारांसह 22 तर आयुब मुन्नोळीने 1 षटकार, 1 चौकारासह 12 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे प्रशांत मुतगेकरने 16 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर संघाने 10 षटकात 8 गडी बाद 56 धावा केल्या. त्यात अमरदीप पाटीलने 2 चौकारांसह 13 तर प्रशांत मुतगेकरने 1 षटकार, 1 चौकारासह 10 धावा केल्या. स्पोर्ट्स ऑनतर्फे अनिकेत लोहारने 1 धावेत 4, दिपक नार्वेकरने 12 धावात 2 तर संतोष सुळगे-पाटील व सादिक तिगडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात तनय स्पोर्टींग संघाने 10 षटकात 8 बाद 56 धावा केल्या. त्यात अभी पाटीलने 1 षटकारासह 13, गजानन झडमाळेने 10 धावा केल्या. के. आर. शेट्टी किंग्जतर्फे मदन बेळगावकरने 17 धावात 4, करण बोकडेने 8 धावात 2 तर किरण तारळेकरने 15 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाने 4.5 षटकात 2 गडी बाद 62 धावा करत सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात मदन बेळगावकरने 1 षटकार, 6 चौकारासह आक्रमक 14 चेंडूत 35, संकल्प शिंदेने 1 षटकार 1 चौकारासह नाबाद 13 धावा केल्या. तनय स्पोर्टींगतर्फे विशाल हंडे व अभी पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात शिवनेरी लायन्स संघाने 7.4 षटकात 7 बाद 41 धावा केल्या. त्यात प्रकाशने 2 चौकारांसह 14, काविश मुक्कन्नावर व मारुती बी. यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे कैयुम पिरजादे व राजने प्रत्येकी 2 तर रब्बानी दफेदारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 5.4 षटकात 5 गडी बाद 42 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात नरेंद्र मांगोरेने 1 षटकार, 2 चौकारांसह 24 तर सुनील गुरवने 10 धावा केल्या. शिवनेरीतर्फे निशांक भीमाने 9 धावात 3 तर ज्ञानदेव गुरव व महेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रणव शेट्टी, मनोज ताशिलदार, रुपेश चिकोर्डे, सागर काळेकर, सुनील माशेकर, जयकुमार पाटील, सुहास पट्टणशेट्टी यांच्या हस्ते सामनावीर व सर्वाधिक षटकार मदन बेळगावकर, संतोष सुळगे-पाटील, इम्पॅक्ट खेळाडू अभिजीत पाटील, प्रशांत मुतगेकर, उत्कृष्ट झेल लला सावंत, दऱ्याप्पा पिल्ले यांना चषक देऊन गौरविण्यात आले.