बेळगाव प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : अर्जुन स्पोर्ट्स क्लब आयोजित बेळगाव प्रिमियर लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या सोमवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून स्पोर्ट्स ऑन संघाने एसआरएस हिंदुस्थान संघाचा 18 धावांनी तर केआर शेट्टी किंग्ज संघाने एवायसीचा 21 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. विशाल गौरगौंडा, संतोष सुळगे-पाटील यांना सामनावीर व इम्पॅक्ट खेळाडू रोहित पाटील, करण बोकडे यांना देण्यात आला. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पोर्ट्स ऑन संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 81 धावा केल्या. त्यात कर्णधार संतोष सुळगे-पाटीलने 2 षटकार, 2 चौकारांसह 22 चेंडूत 39 तर सादीक तिगडीने 1 षटकार, 3 चौकारांसह 15 चेंडूत 18 धावा केल्या. एसआरएस हिंदुस्थानतर्फे रोहित पाटीलने 24 धावात 2 तर विशाल शंभूचे व फयाज सिद्दीकी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थान संघाने 8 षटकात 7 गडी बाद 63 धावा केल्या. त्यात विजय कांबळेने 2 षटकारांसह 20, समीर येळ्ळूरकरने 1 षटकारासह 10 धावा केल्या. स्पोर्ट्स ऑनतर्फे राजू मुजावरने 17 धावात 2, अनिकेतने 19 धावात 2 तर दीपक नार्वेकरने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केआर शेट्टी किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 63 धावा केल्या. त्यात सद्दाम होसकोटीने 1 षटकार, 2 चौकारांसह 21, केदार उसुलकर 2 चौकारांसह 12 तर मदन बेळगावकरने 2 चौकारांसह 11 धावा केल्या. एवायसीतर्फे हर्षद दफेदारने 14 धावात 2, राहुल नाईकने 17 धावात 2 तर शफीकने 20 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एवायसी संघाने 8 षटकात 8 गडी बाद 42 धावाच केल्या. त्यात शफीकने 2 षटकारांसह 12, चेतन पांगिरे व चेतन करगुप्पी यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. केआर शेट्टी किंग्जतर्फे करण बोकडेने 12 धावात 3, विशाल गौरगौंडाने 16 धावात 3 तर मदन बेळगावकर व किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक राजाराम कुडतरकर, क्रीडा शिक्षक विवेक पाटील, जयसिंग राजपूत, चंद्रकांत कडोलकर यांच्या हस्ते सामनावीर विशाल गौरगौंडा, संतोष सुळगे-पाटील व इम्पॅक्ट खेळाडू करण बोकडे व रोहित पाटील, सर्वाधिक षटकार विजय कांबळे व शाफीक, उत्कृष्ट झेल संतोष सुळगे-पाटील व संकल्प शिंदे यांना चषक देऊन गौरविण्यात आले.