श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे त्यांना वेडच आहे असे म्हटले तरी चालेल. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे कमरेवर हात ठेवून पंढरीत भक्तांसाठी उभा असलेला विठोबा हे आहे. संत ज्ञानोबा माऊलींना विठोबाचे रूप दिसते कसे?- तर ‘अगणित लावण्य तेज पुंजाळले’. विठोबाच्या मूर्तीतून तेजाचे लोटच्या लोट येताना त्यांना दिसतात. तर संत तुकोबाराय म्हणतात, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया’. विठोबा सुंदर का दिसतो? कारण ‘तुळशीहार गळा, कासे पितांबर’. त्याच्या गळ्यात घमघम सुगंध देणारा तुळशीचा हार आहे.
विठोबाचे भक्तसुद्धा त्याच्यासाठी मोठ्या प्रेमाने तुळशीचा हार आवर्जून आणतात. तुळस ही काही साधी वनस्पती किंवा झुडूप नाही, तर तिला स्वत:चे असे व्यक्तिमत्व आहे. कुठेही तुळस दिसली की विष्णूभक्त तिला मनोभावे हात जोडतात. तिची पाने-ज्याला दळ असे म्हणतात, उगीचच कुणी तोडायचे धाडस करीत नाही. तुळशीचे दर्शन घेतात. दर्शन याचा अर्थ गुणसंक्रमण असा आहे. तुळशीमध्ये पर्यावरणपूरक औषधी असे गुण तर आहेतच; शिवाय तिच्यामध्ये निरपेक्ष प्रेम हा अपवादात्मक असा गुण आहे. म्हणून ती कृष्णाची प्रिय सखी आहे. तिचा हा गुण आपल्यामध्ये संक्रमित व्हावा म्हणून भक्त मंडळी तिचे दर्शन घेतात, तिची प्रार्थना करतात.
राधेचा जन्मच मुळी श्रीकृष्णासाठी झाला. राधेचा दुसरा अर्थ प्रेम असा आहे. राधेला लवकरात लवकर श्रीकृष्ण भेटावे, त्यांचे दर्शन व्हावे म्हणून तिने तुलसीव्रत केले. भारतीय संस्कृतीमध्ये जी अनेक व्रते आहेत त्यात हे एक प्रधान व्रत आहे. श्रीकृष्णाची भेट घडवून आणण्यासाठी तुळस ही मध्यस्थ आहे. हिचा वशिला लावला की तो जवळून भेटतो. तुलसीचे व्रत हे अश्विन शुद्ध पौर्णिमेपासून सुरू होते. मंत्र म्हणून रोप लावायचे आणि महिनाभर रोज त्या रोपाला पाण्याचे सिंचन करायचे. कार्तिकात तिला दूध घालायचे. मार्गशीर्षात उसाचा रस. पौषात द्राक्ष रस, माघात आमरस, फाल्गुनात फळांचे रस, चैत्रात पंचामृत, वैशाखात शुद्ध जल घालून तुळशीची आराधना करायची. वैशाखाच्या कृष्णप्रतिपदेला तिचे उद्यापन करायचे. राधेने हे व्रत केले तेव्हा सगुण रूपात ती राधेपुढे प्रकट झाली. सुंदर, तेजस्वी अलंकारयुक्त लिंबवर्ण तुलसीने राधेला वर दिला की लवकरच तुला श्रीकृष्ण भेटतील.
तुळशीच्या अनेक कथा आहेत. त्यात एक कथा रुक्मिणीने श्रीकृष्णाला म्हणजे तिच्या पतीला केवळ एका तुलसीदलावर तोलल्याची आहे. कृष्णाची राणी सत्यभामा हिने श्री नारदांना श्रीकृष्णाचे दान केले. नंतर तिला स्वत:ची चूक ध्यानात आली. आता श्रीकृष्ण परत हवा असेल तर श्रीकृष्णांच्या भारंभार सोने द्यावे लागेल ही नारदांची अट स्वीकारून श्रीकृष्णाला तराजूच्या एका पारड्यात बसवले आणि दुसऱ्या पारड्यात सोने टाकले. श्रीकृष्णांच्या सगळ्या राण्यांनी आपले सगळे अलंकार टाकले तरी पारडे काही वर जाईना, तेव्हा रुक्मिणी तिथे आली आणि केवळ एक तुळशीपत्र तिने पारड्यात टाकले. सोन्याच्या राशीवर टाकलेल्या त्या तुळशीपत्राने काय जादू झाली तर ती तुला वर गेली. श्रीकृष्णाने तुळशीवर असलेले आपले प्रेम अप्रत्यक्षपणे अशा रीतीने प्रकट केले आणि तेव्हापासून श्रीकृष्ण आणि तुळस यांच्या विवाहाची प्रथा सुरू झाली. तुळशीचा विवाह केल्याने काय बरे होते? तर हा श्रीकृष्ण आपला जावई होतो. जात्यावर बसून ओवी गाणारी स्त्राr म्हणते-
ज्याला नाही लेक त्यानं तुळस लावावी
सभामंडपात देव करावा जावई
या लेकजावयाचे कोडकौतुक हे माणसाचे अपूर्व असे संचित होते. कोणतीही पूजा असो, ती तुळशीशिवाय, तुळशीदलाशिवाय पूर्ण होत नाही. तुलसीदल हे अतिशय पवित्र आहे. एखाद्या गोष्टीची पूर्ण अभिलाषा सोडून देणे म्हणजे त्या वस्तूवर तुळशीपत्र ठेवणे असे म्हणतात. ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ असा एक वाक्प्रचार आहे. एकदा एका माणसाने भगवंताला हजार पेढे वाटेन असा नवस केला. हा नवस फेडायला त्याच्याजवळ काही पैसे नव्हते. मग त्याने काय केले? जिथे हलवायांची पेढ्यांची दुकाने होती तिथे जाऊन पेढ्यांच्या ढिगाऱ्यावर एक एक तुळशीपत्र वाहून भगवंतांना ते पेढे अर्पण केले आणि आपला नवस पूर्ण केला. अर्थात, नवस अशा रीतीने पूर्ण होत नसतो. पण तुळशीदल वाहणे याचा एक अर्थ ‘अर्पण करणे’ असाही आहे. उत्सवात, पूजेत, यज्ञात देवांच्या नैवेद्याला फार महत्त्व आहे. नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय देवाला नैवेद्य दाखवत नाहीत. तुळस ही दोषांचे हरण करते. स्वयंपाक तयार करणाऱ्यांचे मन अन्नात उतरते. त्याची मन:स्थिती जशी असेल तसे अन्नात गुणदोष निर्माण होतात. तुळशीपत्राने अन्नाचे दोष नाहीसे होतात आणि नैवेद्याला पवित्रता येते. त्यातला दुसरा भाव असा आहे की हे भगवंता, तुम्हाला तुळस जेवढी प्रिय आहे तेवढ्याच प्रेमाने आमचा नैवेद्य ग्रहण करावा. मनुष्याचा देह पडल्यावर किंवा अंतिम समयी त्याच्या मुखात तुळशीचे पान ठेवतात. तुळस ही परमात्म्याला आवडत असल्याने तिच्या आशीर्वादाने, उपस्थितीने या देहातील प्राणतत्त्वाला नेण्यासाठी, या जिवाच्या उद्धारासाठी यमदूतांनी न येता विष्णूदूतांनी यावे ही त्यामागची भावना आहे.
पंढरीच्या वारीला जाताना तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन मोठ्या भक्तिभावाने स्त्रिया चालतात. वारकऱ्यांची ठळक ओळख म्हणजे गळ्यामध्ये असलेली तुळशीमाळ. ही माळ म्हणजे पवित्र बंधन आहे. हा देह माझा नसून भगवंताचा आहे आणि तो त्याच्या नामासाठी आहे, ही भावना तर आहेच, शिवाय पांडुरंगाची ठेव असलेल्या देहाची उपासनापद्धतही. संत तुकोबारायांचा एक अभंग आहे- ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे’. हे वारकऱ्यांचे अप्रतिम शब्दचित्रच आहे. वारकरी कसा दिसतो?
‘गोपीचंदन उटी, तुळशीच्या माळा । हार मिरविती गळा । टाळमृदुंग घाई, पुष्पवर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे?’
पूर्व द्वाराला घरात असलेले तुळशीवृंदावन या घरामध्ये सुसंस्कारी माणसे राहतात असे सांगते. पूर्वीच्या स्त्रियांची तर तुळस ही जिवलग सखीच होती. त्या तिला सारी कौटुंबिक सुखदु:खं सांगायच्या. आपल्या दूर देशी गेलेल्या पतीला, पुत्राला सुखरूप परत आण म्हणून तिची प्रार्थना करायची. प्रवासाला जाताना तुळशीला प्रदक्षिणा करून मगच जायचे. कधीकाळी घराला कुलूप लावावे लागले तर घराच्या रक्षणासाठी तिला सांगून जायचे, ही पद्धत होती. सद्य काळामध्ये तुळशीला पाणी दिले आणि संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावून नमस्कार केला तरी तुळस घराची प्रसन्नता वाढवते हे नक्की.
-स्नेहा शिनखेडे