कॅनडात भारतविरोधी घडामोड : खलिस्तानी दहशतवाद्यांकडून मणिपूरमध्ये कोट्यावधींचे फंडिंग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या हिंसेमागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा देखील हात आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर कुकी समुदायाच्या एका मोठ्या नेत्याने दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूची भेट घेतल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. कुकी समुदायाच्या नेत्याने भेट घेतल्यावर खलिस्तानी नेटवर्कद्वारे कोट्यावधी रुपये हवालाच्या मार्गाने मणिपूरमध्ये पोहोचविण्यात आले आहेत.
भारतीय यंत्रणांना कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया येथील सरेमधील एका प्रार्थनास्थळात आयोजित खलिस्तानी समर्थकांच्या सभेचा व्हिडिओ मिळाला आहे. यात कुकी फुटिरवादी नेते लीन गंग्ते देखील दिसून येतात. गंग्ते नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशन म्हणजेच नामटाचे प्रमुख आहेत.
कॅनडाकडे मागत आहेत आश्रय
ज्याप्रकारे खलिस्तानची मागणी केली जात आहेत, त्याचप्रकारे आम्ही स्वतंत्र मणिपूरसाठी लढत आहोत. मणिपूरमध्ये आमच्या समुदायाच्या नेत्यांना सरकार लक्ष्य करत आहे. या नेत्यांना कॅनडात राजनयिक आश्रय दिला जावा. आमच्या समुदायाला देखील कॅनडात राजकीयदृष्ट्या पुढे जाण्याची संधी मिळावी असे गंग्ते यांनी प्रार्थनास्थळा भारतविरोधी भाषण करताना म्हटले. संबंधित प्रार्थनास्थळाच्या समितीकडून गंग्ते यांना बळ पुरविणार असल्याचे सांगण्यात आले.
दहशतवादी कनेक्शनवरून कारवाई
एनआयएने सरकारविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपाप्रकरणी मणिपूरमध्ये पहिली कारवाई केली आहे. एनआयएने चूराचांदपूर येथून इमीन्लुन गंग्ते याला अटक केली आहे. दहशतवादी संघटना चिन-कुकी-मिझो लोकांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याकरता युद्ध पुकारत असल्याचा आरोप आहे.