शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी
वाकरे / प्रतिनिधी
येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी २३ जागांसाठी ३९० उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
कुंभी कासारी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार दि.६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी २, सोमवारी ७१, मंगळवारी ८७ बुधवारी १९३ तर गुरुवारी १३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
गुरुवारी १३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. आज १२२ उमेदवारांनी दुबार अर्जासह १३३ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम मुदतीपर्यंत ४८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जापैकी ९६ दुबार उमेदवारी अर्ज एकत्र केल्यानंतर ३९० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कारखान्याचे संचालक पी.डी.पाटील (पाटपन्हाळा), अनिता पाटील (खटांगळे ), माजी संचालक बाळासाहेब खाडे, सदाशिव खाडे (सांगरूळ), एस.के.पाटील (कोपार्डे), शैलजा खानविलकर, कुंभी बँकेचे संचालक सुरेश काटकर (पोर्ले), संताजी पाटील (खटांगळे), यशवंत बँकेचे उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर (वाकरे), उदय पाटील (साबळेवाडी), प्रकाश पाटील (आमशी),दत्तात्रय उर्फ बंडा पाटील (खुपिरे), मानसिंग पाटील, शशिकांत आडनाईक (यवलुज), मंगल बी.पाटील (वाकरे) यांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवार दि.१२ रोजी दुपारी ३ पर्यंत होती, त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी झाली होती. शुक्रवार दि.१३ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
तरुण भारतचा अंदाज खरा
विक्री झालेल्या अर्जाचा विचार करता ४०० उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे असा तरुण भारतने अंदाज व्यक्त केला होता, तो खरा ठरला.
गटवार उमेदवारी अर्ज दाखल दाखल झालेल्या अर्जांची संख्या व कंसात संचालकांची संख्या
गट क्रमांक १ – ४८ (३)
गट क्रमांक २- ५५ (५)
गट क्रमांक ३ – ४३ (३)
गट क्रमांक ४ – ५४ (३)
गट क्रमांक ५ – ४५ (४)
अनुसूचित जाती जमाती – २० (१)
महिला प्रवर्ग ६५ (२)
इतर मागासवर्गीय गट -५१ (१)
भटक्या व विमुक्त जाती जमाती – ९ (१)