आजारी कुणाल ला आर्थिक मदतीची गरज
कसबा बावडा प्रतिनिधी
घरची परिस्थिती अत्यंत बिकट, वडील खाजगी कंपनीत सुरक्षारक्षक, आई दुसऱ्या घरची धुनी भांडी करणारी आणि स्वतः हृदयाच्या आजाराने पीडित असलेल्या कुणालने प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत दहावीच्या परीक्षेत यश मिळवले. कुणाल ला पुढील शिक्षण यांत्रिक क्षेत्रात घ्यायचे आहे.
‘आरोग्यम् धनसंपदा’ याप्रमाणे चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती असते. निरोगी शरीर असलेली व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकते. पण शारीरिक व्याधीवर मात करत ध्येय आणि जिद्दीच्या जोरावरही यश मिळू शकते याचे उदाहरण म्हणजे कुणाल संदीप लकडे.
कसबा बावड्यातील जीवन कल्याण हायस्कुलचा दहावीचा विद्यार्थी कुणाल याच्या हृदयाला जन्मताच दोन छिद्रे आहेत. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला असून त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे सध्या त्याच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू आहेत अशा परिस्थितीत आजाराशी संघर्ष करत शिक्षणाची आवड असलेल्या कुणालने जिद्दीच्या जोरावर दहावी परीक्षेत 54% गुण मिळवून यश मिळवले. यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुणाल ला आई वडील व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
आर्थिक मदतीची गरज
कुणाल हा जन्मताच हृदयातील झडपेच्या त्रासाने त्रस्त असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी आई-वडिलांनी अतोनात प्रयत्न केले. काही वेळेला हात उसने पैसे घेऊन त्याच्यावर उपचार केले. पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने कुणाल च्या आई वडिलांना तो न झोपणारा आहे. यासाठी त्याच्या आई-वडिलांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. संपर्क : 8237942028