दरदिवशी 200 ते 300 पर्यटकांची भेट, सुट्टीच्या दिवसांत जास्त गर्दी
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यातील कुसके आणि बामणबुडो धबधब्यांबरोबरच खोतीगाव अभयारण्यातील ट्रीटॉप तसेच अन्य नैसर्गिक स्थळांना भेटी देण्यासाठी गोव्याच्या विविध भागांतील लोकांबरोबरच देशी पर्यटकांनी सध्या गर्दी केली आहे. या दिवसांत सतत पडत असलेल्या पावसामुळे हे दोन्ही धबधबे पूर्ण जोमाने वाहू लागले असून या विलोभनीय दृष्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांत गर्दी उसळत आहे.
कुसके धबधब्यावर जाण्यासाठी दर माणशी 100 रु. इतकी फी आकारण्यात येत आहे. ही फी हत्तीपावल येथील चेकनाका त्याचप्रमाणे कुसके येथेही खास उभारलेल्या कक्षात घेण्याची सोय वन खात्याने केली आहे. दोन्ही ठिकाणी वन खात्याने खास कक्ष सुरू केले आहेत. त्याशिवाय कुसके धबधब्याजवळ कसलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन खात्याने खास वनरक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या ठिकणी कसलीच तक्रार आलेली नाही, अशी माहिती अभयारण्य विभागाकडून देण्यात आली. कुसके धबधब्याला भेट देणाऱया प्रत्येक पर्यटकाला मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यक ती माहिती हत्तीपावल येथील अभयारण्य विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱयांकडून दिली जात असून कुसके धबधब्याला या हंगामात दिवसाला किमान 200 ते 300 पर्यटक भेट देत असतात, असे सांगण्यात आले आहे.
बामणबुडो धबधबाही पर्यटकांसाठी खुला असून या ठिकाणी मात्र अनुचित प्रकार घडत असल्याच्या तक्रारी वाढायला लागल्या आहेत. गावडोंगरी पंचायत कक्षेतील या धबधब्याजवळ पोलीस पहारा ठेवण्यात यावा अशी मागणी या पंचायतीचे प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱया प्रदीप पागी यांनी केल्यानंतर उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी त्वरित कृती करून काणकोणच्या पोलिसांनी या ठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. मागच्या आठवडय़ात दोन युवकांना या धबधब्याजवळ दंगामस्ती करण्याबरोबर महिला पर्यटकांची छेड काढल्याप्रकरणी काणकोणचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन सोडून दिलेले आहे.