महाराजांचे भाकीत ठरले खरे : ‘गॅरंटी’ योजना लवकर अमलात आणण्याची दिली ग्वाही
वार्ताहर /किणये
राज्याच्या महिला व बालकल्याण विभाग मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी हलगा गावचे आचार्य श्री 108 सिद्धसेन मुनी महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे समर्थक व हलगा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी सिद्धसेन मुनींची भेट घेतली होती. तेव्हा महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला होता आणि या मतदारसंघातून तुमचा मोठा विजय होईल आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून निवड केली जाईल, असे सांगितले होते. महाराजांनी उपदेशपर सांगितलेले सर्व खरे ठरले आहे, याची आठवण लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी करून दिली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील काँग्रेस सरकारने घोषित केलेल्या महिला, बेरोजगार, तरुण व सर्वसामान्यांसाठीच्या योजना लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा समाजाच्या व ग्रामस्थांच्यावतीने मानाचा फेटा, पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.