वार्ताहर /किणये
कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी हिरेबागेवाडी व बडेकोळमठाला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाटकाच्या राज्य मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण हे खाते ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांना मिळाले आहे. शनिवारी त्यांचा शपथविधी कार्यक्रम झाला. रविवारी बेळगाव परिसरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सोमवारी त्यांनी हिरेबागेवाडी गावाला भेट दिली. यावेळी जगज्योती बसवेश्वर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन केले .त्यानंतर हिरेबागेवाडी गावात नागरिकांशी संवाद साधला व या भागात विविध विकास कामांबद्दल ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर हिरेबागेवाडी येथील दर्ग्याला त्यांनी भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तारिहाळ येथील पावन क्षेत्र बडेकोळ मठाला लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट दिली. बडेकोळमठाचे दर्शन घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. ग्रामीण मतदार क्षेत्रातील नागरिकांच्या विश्वासामुळेच आणि त्यांच्या सहकार्यानेच आपल्याला मंत्रिपद मिळाले आहे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करीत राहणार असे त्यांनी नागरिकांना सांगितले. सोमवारी दिवसभर त्यांना भेटण्यासाठी ग्रामीण मतदार क्षेत्रातील त्यांचे समर्थक, काँग्रेस कार्यकर्ते येत होते. लक्ष्मी हेब्बळकर यांच्यावर त्यांच्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.