: एचएस प्रणॉय, सात्विक-चिराग यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ टोकियो
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने येथे सुरू असलेल्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. मात्र एचएस प्रणॉय आणि सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांचे आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असणाऱ्या लक्ष्य सेनने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत स्थानिक खेळाडू कोकी वाटानाबेचा 21-15, 21-19 असा पराभव केला. कोकी हा जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर आहे. कॅनडा व अमेरिकेतील स्पर्धेनंतर लक्ष्य सेनने सलग तिसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. राष्ट्रकुलचा विद्यमान चॅम्पियन असलेल्या लक्ष्य सेनची उपांत्य लढत पाचव्या मानांकित इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्तीशी होणार आहे.
जागतिक दहाव्या मानांकित एचएस प्रणॉयला मात्र सेनप्रमाणे उपांत्य फेरी गाठता आली नाही. जागतिक अग्रमानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेनविरुद्ध त्याने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या गेममध्ये 7-1 अशी बढत मिळविली होती. पण त्याला या आघाडीचा लाभ घेता न आल्याने प्रणॉयला 21-19, 18-21, 8-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
अलीकडे जबरदस्त कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. चिनी तैपेईच्या ऑलिम्पिक चॅम्पियन ली यांग व वांग चि लान यांनी सात्विक-चिरागवर चुरशीच्या लढतीत 15-21, 25-23, 16-21 अशी मात करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले आणि सात्विक-चिरागची बारा सामन्यांची विजयी मालिकाही खंडित केली.
2021 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या लक्ष्य सेनने या महिन्यातच कॅनडा ओपन सुपर 500 स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. त्याने कोकीवर 5-3 अशी आघाडी घेतली आणि नंतर ब्रेकपर्यंत ती 11-7 अशी केली. जपानच्या या खेळाडूशी मुकाबला करताना सेनला फारशा अडचणी आल्या नाहीत आणि दोन क्रॉस कोर्ट परतीचे फटके मारत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये कोकीने रॅलीजचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला. पण सेनने नियंत्रण राखत एका शानदार क्रॉस कोर्ट ड्रॉप शॉटवर 3-2 अशी आघाडी घेतली. 42 शॉट्सची एक दीर्घ रॅली कोकीने जिंकून सेनवर 5-3 अशी आघाडी घेत नंतर ती 7-3 अशी वाढवली. कोकीने भक्कम बचाव करीत संघर्ष केला तेव्हा सेन 7-14 असा पिछाडीवर पडला होता. मात्र नंतर त्याने मुसंडी मारत बाजू पलटवताना कोकीला नेटजवळ खेचत ड्रॉप शॉट्सचा प्रभावी वापर केला. कोकीच्या दोन परतीच्या फटक्यानंतर सेनला मॅचपॉईंट मिळाला. त्याने अचूक परतीचा फटका मारत विजयी गुण मिळविल्यानंतर जल्लोष सुरू केला.