एमआर अर्जुन-ध्रुव कपिला दुहेरीत 21 व्या स्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीएफडब्ल्यूने जाहीर केलेल्या पुरुष बॅडमिंटनपटूंच्या ताज्या मानांकनात भारताच्या लक्ष्य सेनने एका स्थानाची प्रगती करीत आठवे स्थान मिळविले असून आजवरचे त्याचे हे सर्वोच्च मानांकन आहे.
भारताची पुरुष दुहेरीची जोडी एमआर अर्जुन व धुव कपिला यांनी टॉप 20 मध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली असून दोन स्थानांची प्रगती करीत ते 21 व्या स्थानावर पोहोचले आहेत. दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणाऱया पीव्ही सिंधूने महिला एकेरीतील सहावे स्थान कायम राखले असून चिराग शेट्टी-सात्विक साईराज रणकिरेड्डी यांनी पुरुष दुहेरीत आठवे स्थान मिळविले आहे.
21 वर्षीय लक्ष्य सेनने 2021 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविले होते तो या मोसमात चांगल्या फॉर्ममध्ये असून या वर्षाच्या सुरुवातीस त्याने इंडिया ओपनमध्ये जेतेपद मिळविले तर प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपमध्ये तसेच जर्मन ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. याशिवाय 73 वर्षांनंतर भारताने थॉमस चषक स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद प्रथमच पटकावण्याचा पराक्रम केला, त्या संघाचाही लक्ष्य सेन महत्त्वाचा सदस्य होता.
फॉर्ममध्ये असलेल्या अर्जुन व धुव यांनी मानांकनात हळहळू प्रगती केली असून वर्षाची सुरुवात त्यांनी 42 व्या स्थानावरून केली होती. अलीकडेच झालेल्या इंडिया महाराष्ट्र इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेचे त्यांनी जेतेपद मिळविले असून धक्कादायक निकाल देणारी जोडी, अशी त्यांनी ओळख निर्माण केली आहे. यावर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी असाच एक अपसेट निकाल नोंदवताना जागतिक आठव्या मानांकित डेन्मार्कच्या किम ऍस्ट्रप व अँडर्स रासमुसेन यांना पराभूत केले होते.