मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे गौरवोद्गार : इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन
बेंगळूर : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लॅन्डर सुरक्षितपणे उतरविणे ही ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यासाठी इस्रो संस्थेतील सर्व वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काढले. गुरुवारी सकाळी त्यांनी बेंगळरच्या इस्रोच्या टेलिमेटरी, टॅकींग अॅण्ड कमांड नेटवर्क सेंटरला भेट देऊन इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ व इतर वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. इस्रोच्या कमांड सेंटरला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तेथील वैज्ञानिकांशी संवाद साधला. तसेच चांद्रयान-3 या मोहीमेची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, इस्रोच्या कामगिरीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. रशिया, अमेरीका, चीन हे देश वगळता चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. त्यामुळे इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचे आम्ही अभिनंदन केलेच पाहिजे.
विधानसौधमध्ये सत्कार समारंभ आयोजिणार
विधानसौधमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून इस्रोच्या वैज्ञानिकांचे राज्य सरकारच्यावतीने गौरव केला जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्यासह कर्नाटकातील 500 वैज्ञानिक चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांचाही सत्कार केला जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी हजारहून वैज्ञानिकांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले आहेत. बेंगळूरमधूनच 500 जण सहभागी झाले आहेत. 2 सप्टेंबरनंतर सत्कार कार्यक्रमाची तारीख निश्चित केली जाईल, अशी माहिती सिद्धरामय्यांनी दिली.