वृत्तसंस्था/ मुन्नार
केरळमध्ये अतिवृष्टीदरम्यान मुन्नार येथे भूस्खलनाची घटना घडली आहे. कुंडलानजीक एक वाहन उलटल्याने 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह रविवारी सकाळी हस्तगत झाला आहे. रपेश असे या मृताचे नाव आहे. तो दरड वाहनावर कोसळल्याने वाहनातच अडकून पडला होता. बचाव मोहीम शनिवारी रात्री अतिवृष्टीमुळे रोखण्यात आली होती. रविवारी सकाळी बचावकार्य सुरू करण्यात आल्यावर मृतदेह हस्तगत झाला आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्य़ात अतिवृष्टी होत आहे. पर्वतीय क्षेत्रात मुन्नार-वट्टावदा मार्गावर भूस्खलन झाल्याने एक टेम्पो ट्रव्हलरवर दरड कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश समवेत अनेक राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. इडुक्की जिल्हय़ासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट तर पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.