दुसऱ्या वनडेत 132 धावांनी दणदणीत विजय : मालिकेत 1-1 बरोबरी : तिसरा व अंतिम सामना बुधवारी
वृत्तसंस्था/ हंबनटोटा
पहिल्या वनडेत सपाटून मार खाल्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात मात्र यजमान श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 132 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह लंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता, उभय संघातील तिसरा व अंतिम सामना दि. 7 रोजी होईल. तीन बळी व नाबाद 29 धावा करणाऱ्या लंकेच्या धनजंय डी सिल्वाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 323 धावा केल्या. कुशल मेंडिसने सर्वाधिक 75 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 78 धावा केल्या. याशिवाय, दिमुथ करुणारत्नेने 62 चेंडूत 52 धावा करत त्याला चांगली साथ दिली. सलामीवीर निसंकाने 43, समरविक्रमाने 44, धनजंय डी सिल्वाने नाबाद 29 धावांचे योगदान दिले. तळाच्या फलंदाजांनीही फटकेबाजी करत लंकेला त्रिशतकी मजल मारुन दिली. अफगाणकडून फरीब अहमद व मोहम्मद नाबीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 42.1 षटकांत 191 धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात 98 धावांची खेळी साकारणाऱ्या इब्राहिम झद्रनने या सामन्यातही 75 चेंडूत 54 धावांची खेळी साकारली. याशिवाय, कर्णधार हशमतउल्लाहने 57, रेहमत शाह 36 तर उमरझाईने 28 धावा केल्या. इतर खेळाडूंनी मात्र सपशेल निराशा केल्यामुळे अफगाणिस्तानला दुसऱ्या वनडेत 132 धावांनी हार पत्कारावी लागली. लंकेकडून वहिंदू हसारंगा, धनजंय डी सिल्वाने तीन तर चामीराने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 50 षटकांत 6 बाद 323 (निसंका 43, करुणारत्ने 52, कुशल मेंडिस 78, समरविक्रमा 44, डी सिल्वा नाबाद 29, हसारंगा नाबाद 29, फरीब अहमद व मोहम्मद नाबी प्रत्येकी दोन गडी)
अफगाणिस्तान 42.1 षटकांत सर्वबाद 191 (इब्राहिम झद्रन 54, हशमतउल्लाह 57, रेहमत शाह 36, हसरंगा, डी सिल्वा प्रत्येकी तीन बळी)