रिव्हेंज ड्रामापटाचे चित्रिकरण पूर्ण
लारा दत्ता स्वत:ची आगामी वेबसीरिज ‘रणनीति : बालाकोट अँड बियाँड’वरून सध्या चर्चेत आहे. ही सीरिज बालाकोट एअरस्ट्राइकवर आधारित आहे. याचबरोबर ती आगामी चित्रपट ‘सूर्यास्त’वरून प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण ब्रिटनमध्ये पूर्ण झाले आहे. लारा दत्तासोबत या चित्रपटात पत्रलेखा पॉल देखील मुख्य भूमिकेत आहे. या रिव्हेंज ड्रामा पटाचे दिग्दर्शन अभिषेक घोषने केले आहे. या चित्रपटाच्या सेटवर अविश्वसनीय अनुभव मिळाला. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या या सेटवर गुंतून गेले होते. आगामी काळात देखील मी अवंतिकाची व्यक्तिरेखा कधीच विसरू शकणार नाही. अशाप्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी असल्याचे लाराने म्हटले आहे.
सूर्यास्तमधील माझ्या व्यक्तिरेखेला अनेक अद्भूत छटा आहेत. हा चित्रपट निश्चितच प्रेक्षकांना मोठा आनंद मिळवून देईल, असे पत्रलेखाने म्हटले आहे. सूर्यास्त चित्रपटाद्वारे लारा अन् पत्रलेखासोबत काम करण्याची संधी मिळाली. दोन्ही अभिनेत्रींनी उत्तम कामगिरी केली असल्याने सूर्यास्तचा प्रवास अद्भूत अनुभव ठरल्याचे घोष यांनी म्हटले आहे.