विजेवर चालणाऱया कारच्या बॅटरीसाठी अत्यावश्यक धातू असल्याने महत्व
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात प्रथमच अत्यंत महत्वाच्या लिथियम धातूचे मोठे साठे सापडले असून ते जम्मू-काश्मीरच्या रियासी भागात भूगर्भात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. लिथियम हा धातू बहुमूल्य असून तो विजेवर चालणाऱया कार किंवा दुचाकी वाहनांच्या रिचार्जेबल बॅटऱया तयार करण्यासाठी उपयोगात आणला जातो.
भारतात लिथियमचे साठे जवळपास नाहीत अशीच स्थिती होती. त्यामुळे वाहने तसेच इलेक्ट्रॉनिक साधने यांच्या बॅटऱयांची आयात भारताला चीनकडून करावी लागत आहे. त्यामुळे भारत यासंदर्भात परावलंबी बनला आहे. याचा मोठा लाभ चीनला होत आहे. मात्र आता भारततही लिथियमचे साठे सापडल्याने भारताचे चीनवरचे अवलंबित्व कमी होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
किती आहे लिथियम
नव्याने सापडलेल्या साठय़ांमध्ये लिथियम 59 लाख टन इतके आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. लिथियम प्रमाणेच सोन्याचेही साठे सापडले आहेत. या साठय़ांमध्ये 8 ते 10 लाख किलो सोने मिळू शकेल असे अनुमान आहे. लिथियम प्रमाणे भारत सोन्याची आयातही मोठय़ा प्रमाणात करतो. भारताने सोन्याची आयात थांबविल्यास त्याच्या आर्थिक विवंचना संपतील असे संशोधकांचे मत आहे.
लिथियमची आयात कोणाकडून
सध्या भारत लिथियमची आयात चीन आणि ऑस्ट्रेलियाकडून प्रामुख्याने करतो. तर लिथियम अयॉन बॅटऱया आपल्या आवश्यकतेच्या 80 टक्के या प्रमाणात चीनकडून आयात कराव्या लागतात. लिथीयमच्या संदर्भात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी भारत सध्या अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यासारख्या लिथियमच्या संदर्भात श्रीमंत असणाऱया देशांमधील खाणींमधील हिस्सेदारी खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र आता भारतात हे साठे सापडल्याने भारतातील लिथियमचे खननकर्म करुन त्याचे शुद्धीकरण करण्याच्या उद्योगात भारताला गुंतवणूक करावी लागणार आहे.
कोणी केले संशोधन
लिथियमचे संशोधन केंद्र सरकारच्या नियंत्रणात असणाऱया भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या संस्थेने केले आहे. या संस्थेने भारतात सापडू शकतील अशा विविध 51 खनिजांचा अहवाल विविध राज्य सरकारांना सादर केला आहे. लिथियम आणि सोन्याप्रमाणेच पोटॅशियम, मोलेब्डिनम इत्यादी धातूंची क्षेत्रे आढळली आहेत. अशी 51 क्षेत्रे असून तेथे बहुमूल्य धातूंचे मोठे साठे सापडू शकतात, असे सर्वेक्षणाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या राज्यांमध्ये आहेत साठे ?
विविध खनीजांचे हे साठे जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांमध्ये आहेत. विविध खनिजे या राज्यांमध्ये कोठेकेठे मिळू शकतात याचे नकाशेही अहवालात देण्यात आले आहेत. यांपैकी लिथियम आणि सोन्याचा शोध हा भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मानण्यात येत आहे.